Join us  

"मी शेजाऱ्यांचं दार तोडलं आणि...", सायली संजीवने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली, "त्यानंतर आईने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 12:39 PM

'लोकमत फिल्मी'च्या 'ऑकवर्ड रॅपिड फायर'मध्ये विचारलेल्या प्रश्नांना सायलीने अगदी मजेशीर पद्धतीने उत्तरं दिली. या रॅपिड फायरमध्ये सायलीने एक किस्साही सांगितला.

'काहे दिया परदेस' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. अभिनयाबरोबरच लाघवी सौंदर्याने सायलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. पहिल्याच मालिकेने लोकप्रियता मिळवून दिल्यानंतर सायली अनेक चित्रपटांतही काम केलं. सध्या सायली तिच्या 'झिम्मा २' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'झिम्मा २'च्या निमित्ताने सायलीने लोकमत फिल्मीशी संवाद साधला. 

'लोकमत फिल्मी'च्या 'ऑकवर्ड रॅपिड फायर'मध्ये विचारलेल्या प्रश्नांना सायलीने अगदी मजेशीर पद्धतीने उत्तरं दिली. या रॅपिड फायरमध्ये सायलीने एक किस्साही सांगितला. "शेजाऱ्यांच्या दाराची बेल वाजवून कधी पळाली आहेस का?" असा प्रश्न सायलीला विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली, "अनेकदा...फक्त बेल नाही वाजवली, मी तर शेजाऱ्यांचं दार पण तोडलं आहे. हा खरंच घडलेला किस्सा आहे. शेजाऱ्यांची आम्ही बेल वाजवत होतो. पण, बराच वेळ झाला तरी कोणी दारच उघडलं नाही. त्यामुळे आतमध्ये कोणाला काही त्रास झालाय का? असं टेन्शन सगळ्यांना आलं होतं." 

"मी निर्णय घ्यायला वेळ लावत नाही. आता आपल्याला जे योग्य वाटतंय ते करून मोकळं व्हायचे...नंतरचे परिणाम नंतर बघून घेऊ, अशी मी आहे. त्यामुळे मी सांची घेऊन, खलबत्त्यातील बत्ता घेऊन त्यांचं दार तोडलं. लॅच तोडणं सगळ्यात अवघड असतं, ते दार मी तोडलं. मी लॅच तोडलं आणि आतल्या मुलाने दार उघडलं. आणि ते पाहून मी आश्चर्यचकित झाले. तो मुलगा खूप गाढ झोपेत होता. त्यामुळे त्याने दार उघडलं नाही आणि मी त्यांचं दार तोडलं. त्यानंतर माझी आई माझ्यावर खूप हसत होती. पण, यात तुझी काही चूक नाही असंही माझी आई म्हणाली.कोणी येईल, चावी बनवेल याची मी वाट पाहत बसले नाही," असंही सायलीने पुढे सांगितलं. 

 'झिम्मा २' या सिनेमातून सायली प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या सिनेमात सायलीबरोबर क्षिती जोग, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हेमंत ढोमेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :सायली संजीवमराठी अभिनेताटिव्ही कलाकारमराठी चित्रपट