Join us

सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधवमध्ये १० वर्षे होता अबोला, कारण...; अभिनेत्रीनेच स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 16:13 IST

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीने सिद्धार्थ जाधवसोबत जवळपास १० ते १२ वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते, याबद्दल खुलासा केला.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते. नुकतेच सोनालीने झी मराठी वाहिनीवरील बस बाई बस या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने सिनेइंडस्ट्री आणि तिथल्या अनुभव आणि किस्से सांगितले. यावेळी तिने सिद्धार्थ जाधवसोबतचाही एक किस्सा शेअर केला. 

सोनाली कुलकर्णीनेसिद्धार्थ जाधवसोबत जवळपास १० ते १२ वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते, याबद्दल खुलासा केला. तसेच त्यांच्यात पुन्हा कशी मैत्री झाली याबद्दलही तिने सांगितले. ‘बस बाई बस’ या कार्यक्रमादरम्यान सुबोध भावेने सोनालीला तुझे कधी सहकलाकारासोबत भांडण झाले आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने हो असे उत्तर दिले. त्यावर सुबोध भावेने नाव विचारताच सोनालीने पटकन सिद्धार्थ जाधवचं नाव घेतले आणि किस्साही सांगितला.

सोनाली कुलकर्णीने सांगितले की, सिद्धार्थ जाधव आणि मी सतत भांडत असतो. आम्ही इरादा पक्का चित्रपटाचे शूट करत होतो. त्यावेळी आम्ही एकमेकांशी काहीही बोलतच नव्हतो. आमचे कास्टिंग झाले, त्यानंतर आमचे भांडण झाले. क्षणभर विश्रांती नंतर आमचे इरादा पक्काचे शूटिंग होणार होते. त्याआधी मला केदार जाधव यांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं सॉरी आम्ही वेगळी मुलगी शोधतोय. त्यावेळी मी केदार जाधव यांना दुसरी मुलगी शोधण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, तू आणि सिद्धार्थ जाधव एकमेकांचा चेहराही बघत नाही. ही रोमँटिक जोडप्याची गोष्ट आहे, मग हे शूट कसे होणार ? त्यावेळी मी त्यांना विचारले, तुम्ही मला का काढत आहात, सिद्धार्थ जाधवला तुम्ही नाही काढणार…, तो तुमचा लाडका ना असे बोलून ओके सांगत फोन ठेवला होता.

त्यानंतर केदार जाधव यांनी पंधरा-वीस दिवसांनी मला पुन्हा फोन केला आणि हे काम तुलाच करावा लागणार आहे. त्या भूमिकेसाठी दुसरी मुलगी अद्याप सापडत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर शूटींगवेळी सिद्धार्थ जाधव हा केदार जाधव यांच्यासोबत वेगळी तालीम करायचा आणि मी त्यांच्यासोबत वेगळी तालीम करायचे. मी आणि सिद्धार्थ फक्त त्या चित्रपटातील केवळ एका रोलसाठी समोरासमोर उभे राहायचे आणि त्यानंतर पुन्हा आमच्या कामाला लागायचो. जवळपास आम्ही एकमेकांशी बोलतच नव्हतो. आम्ही जवळपास दहा वर्ष एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही.

पुढे सोनालीनं सांगितलं की, त्यानंतर एकदा अचानक प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं. त्यावेळी अचानक सिद्धार्थ जाधवचा मला फोन आला आणि तो म्हणाला, आपलं आयुष्य हे किती क्षणभंगूर आहे. कधी, कुठे, केव्हा काय होईल, हे माहित नाही. असेच अचानक कधीतरी मी गेलो किंवा तू गेलीस तर जो उरलेला असेल त्याला कायम आयुष्यभर या गोष्टींचा दोष असल्यासारखे वाटेल आणि मला असे होऊ द्यायचे नाही. त्यामुळे सॉरी मी गेली दहा वर्ष तुझ्याशी बोललो नाही याची मला खंत वाटते. मी माझ्या मैत्रिणीला गेली दहा वर्ष खूप मिस केले आणि काय झाले असेल त्यासाठी मी सॉरी बोलतो आपण पुन्हा बोलूया का? मग आम्ही भेटलो बोललो आणि आता आम्ही एकमेकांशी बोलतो पण आम्ही अजूनही तितकेच भांडण करतो.

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसोनाली कुलकर्णीसुबोध भावे