Join us  

पडद्यावरच्या पर्रीकरांची मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली, योगेश सोमण झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 10:45 PM

योगेश सोमण यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत पर्रीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुंबई: प्रदीर्घ कालावधीपासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या मनोहर पर्रीकर यांची प्राणज्योत आज मालवली. त्यांच्या निधनामुळे सारा देश शोकसागरात बुडाला आहे. एक अतिशय साधा आणि नम्र नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या उरी या चित्रपटात पर्रीकर यांची भूमिका अभिनेते योगेश सोमण यांनी साकारली. त्यांनीही पर्रीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

योगेश सोमण यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत पर्रीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं दुःखद निधन झालं आहे. माझ्याकडून त्यांना श्रद्धांजली,' अशा शब्दांमध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 'माझी चेहरेपट्टी तुमच्याशी जुळत असल्याने मला तुम्हाला भेटण्याची आणि तुम्हाला जाणून घेण्याची संधी मिळाली. मनोहरजी, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली,' असं सोमण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पर्रीकर यांचा स्वभाव अतिशय साधा आणि शांत होता. मात्र ज्यावेळी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी उरीमध्ये हल्ला केला, त्यानंतर पर्रीकर यांनी पाकिस्तानला अद्दल घडवण्याची भूमिका अतिशय ठामपणे मांडली. त्यावेळची पर्रीकर यांची अस्वस्थता आणि कणखरपणा योगेश सोमण यांनी उत्तमपणे पडद्यावर साकारला. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याने रात्री केलेल्या कारवाईवर पर्रीकर रात्रभर नजर ठेवून होते.

उरी चित्रपटात योगेश सोमण यांनी पर्रीकर यांची भूमिका अतिशय समर्थपणे साकारली. मात्र या व्यक्तिरेखेला पर्रीकर हे नाव देण्यात आलेलं नाही. सोमण यांनी रविंद्र अग्निहोत्री ही भूमिका साकारली होती. भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकवर बेतलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 240 कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली आहे.  

टॅग्स :मनोहर पर्रीकरमृत्यूगोवाउरी