Join us

सुरू झाला इरफान खानचा अंतिम प्रवास, शांततेत पार्थिव नेण्यात आले कब्रस्तानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 14:30 IST

सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने इरफानचे पार्थिव त्याच्या घरी न नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देअतिशय शांततेत इरफानचे पार्थिव वर्सोवा येथील दफनभूमीत आणण्यात आले असून तिथे थोड्यात वेळात त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या इरफान खानचे नुकतेच निधन झाले. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. इरफानला केवळ भारतातच नव्हे तर जगभर फॅन फॉलोव्हिंग होते. इरफानचे निधन मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात झाले. सध्या कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाऊन असल्याने इरफान खानच्या अंत्यदर्शनाला गर्दी होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इरफानचे पार्थिव घरी न नेता थेट दफनभूमीत नेण्यात आले.

अतिशय शांततेत इरफानचे पार्थिव वर्सोवा येथील दफनभूमीत आणण्यात आले असून तिथे थोड्यात वेळात त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे. सध्या दफनभूमीत केवळ त्याचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित आहेत.  

इरफान अंधेरी येथे त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहात होता. त्याने अंधेरी येथील हे घर काहीच महिन्यांपूर्वी घेतले होते. त्याआधी तो मढ आयलँडमध्ये राहात होता. इरफानने पिकू, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या. तसेच लाइफ ऑफ पाय, ज्युरॅसिक वर्ल्ड यांसारख्या हॉलिवूड चित्रपटातही तो अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. इन्फर्नो या टॉम हँक्स यांच्या चित्रपटात इरफान प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.

इरफानने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चाणक्य, भारत एक खोज, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. त्याने त्यानंतर एक डॉक्टर की मौत, सच अ लाँग जर्नी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मकबूलमधील भूमिकेमुळे मिळाली. 

टॅग्स :इरफान खान