Join us  

प्रविण दरेकरांनी थेट विधानसभेत मांडला प्रसाद खांडेकरचा मुद्दा, फडणवीस म्हणाले, 'कायदेशीर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 2:59 PM

विधानसभेत प्रसाद खांडेकरचा तो मुद्दा प्रविण दरेकरांनी लावून धरला

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरचा (Prasad Khandekar) पहिला दिग्दर्शित सिनेमा 'एकदा येऊन तर बघा' प्रदर्शित होतोय. मात्र मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नसल्याचा फटका प्रसादलाही बसतोय.  हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विधानपरिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी बोरिवलीतील हास्य कलाकार व उद्योन्मुख मराठी दिग्दर्शक अभिनेते प्रसाद खांडेकर यांच्या नवीन मराठी चित्रपटाला हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मुजोर दादा लोकांकडून थिएटर उपलब्ध करून दिले जात नसल्याबद्धल प्रश्न उपस्थित केला. मराठी चित्रपटांच्या होणाऱ्या या गळचेपीबाबत राज्य शासनाने लक्ष घालून सहकार्य करावे अशी मागणीही त्यांनी केली. त्याला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले.

विधानपरिषदेत बोलताना आमदार प्रविण दरेकर म्हणाले, "मागाठाणे विधानसभा क्षेत्रात बोरीवली कुलूपवाडी येथे राहणारा एक हुशार होतकरू हास्य कलाकार मराठी तरुण अभिनेता प्रसाद खांडेकर यांचा उद्या ८ डिसेंबर २०२३ रोजी 'एकदा येऊन तर बघा' हा मराठी चित्रपट प्रसिद्ध होत आहे. पण हिंदी चित्रपटांच्या मनमानीमुळे खांडेकर यांच्या चित्रपटाला  थिएटर मिळत नाही. बोरीवली कुलूपवाडी येथील एक उभरता मराठी होतकरू तरुण कलाकार-दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा मराठी सिनेमा घेऊन येत आहे पण त्याला सिनेमागृह मिळत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालून सहकार्य करावे, अशी विनंती केली.

आ. दरेकर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद खांडेकर हे अत्यंत गुणी कलावंत आहेत. हास्यजत्रेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने त्यांनी लोकांच्या मनावर प्रचंड पगडा निर्माण केला आहे. अशा मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. पण ते थिएटर उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वस्त केले.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेतामराठी चित्रपटप्रवीण दरेकरदेवेंद्र फडणवीसविधानसभा हिवाळी अधिवेशन