Join us  

सत्यजीत दुबे सांगतोय, या व्यक्तीमुळे मिळाला प्रस्थानम हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 6:00 AM

सत्यजीत दुबे प्रस्थानम या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

ठळक मुद्देप्रस्थानम या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटात सत्यजीत दुबे एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या एकंदर करियरविषयी आणि या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी त्याच्यासोबत मारलेल्या गप्पा...

प्रस्थानम या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटात सत्यजीत दुबे एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या एकंदर करियरविषयी आणि या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी त्याच्यासोबत मारलेल्या गप्पा...

चित्रपटसृष्टीत कोणीही गॉडफादर नसताना या क्षेत्रात कशाप्रकारे पदार्पण केलेस?मी केवळ बारा वर्षांचा असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. माझ्या आजीने मला लहानाचे मोठे केले. छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावात माझे शिक्षण झाले आहे. इंडस्ट्रीतील कोणालाच मी ओळखत नव्हतो. पण अभिनयाची आवड असल्याने 2007 मध्ये मी मुंबईत आलो. त्यावेळी मी केवळ 16 वर्षांचा होतो. मी अतिशय मेहनत करून आज इथवर पोहोचलो आहे.

प्रस्थानम या चित्रपटासाठी तुझी निवड कशाप्रकारे झाली?प्रस्थानम या चित्रपटाआधी मी तीन चित्रपटांमध्ये काम केले होते. पण प्रस्थानम हा माझा पहिलाच चित्रपट असल्यासारखे मला वाटतेय. अल्वेज कभी कभी या चित्रपटाद्वारे माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण माझा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. मात्र या चित्रपटामुळे माझे अभिनेता बनवण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या चित्रपटाने मला खूप काही शिकवले. माझा केरी ऑन कट्टन हा दुसरा चित्रपट मान्यता दत्त यांनी पाहिला आणि त्यांनी माझे नाव संजय दत्त यांना सुचवले आणि अशाप्रकारे या चित्रपटाच्या टीममध्ये माझी एंट्री झाली. मी गेल्या अनेक वर्षांपासून एखादा चांगला चित्रपट मिळावा याची वाट पाहात होतो आणि प्रस्थानममुळे माझे हे स्वप्न पूर्ण झाले.

या चित्रपटात काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?संजय दत्त यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. ते सेटवर अक्षरशः मला त्यांच्या मुलाप्रमाणे वागवायचे. जॅकी श्रॉफ, मनिषा कोईराला यांसारख्या दिग्गजांसोबत मला काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. जॅकी श्रॉफ यांच्यासोबत तर चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसांपासूनच खूप चांगली मैत्री झाली. तर अली फजलसोबत मी माझ्या पहिल्या चित्रपटात काम केले होते. त्यामुळे आमची दोघांची खूपच चांगली मैत्री आहे. पण या चित्रपटात माझे त्याच्यासोबत पटत नाही असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही व्यक्तिरेखा साकारणे खूपच कठीण होते.

या चित्रपटातील ॲक्शन दृश्यांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे, त्याविषयी काय सांगशील?प्रस्थानम या चित्रपटात खूप सारे ॲक्शन दृश्यं असून त्यातील अनेक दृश्यं ही माझ्यावर आणि अलीवर चित्रीत करण्यात आली आहेत. ॲक्शन दृश्यांचे चित्रीकरण करणे हे नेहमीच कठीण असते. पण या दृश्यांमुळेच तुम्ही किती फिट आहात हे तुम्हाला कळते. या चित्रपटात अली आणि माझा एक रेल्वे ट्रॅकवर ॲक्शन सीन आहे, त्या सीनच्यावेळी तर मला चांगलीच दुखापत झाली होती. 

टॅग्स :प्रस्थानमसंजय दत्तजॅकी श्रॉफअली फजलमनिषा कोईराला