Join us  

'गलिच्छ गाणे का गातो?', 'मग लोक का ऐकतात?' हनी सिंग स्पष्टंच बोलला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 6:57 PM

रॅपर हनी सिंगवर अनेकदा आक्षेपार्ह गाणे गायल्याचा आरोप लागला आहे.

Honey Singh: प्रसिद्ध सिंगर-रॅपर हनी सिंग त्याचा नवीन अल्बम 'हनी सिंग 3.0' घेऊन येत आहे. या अल्बममधील 'नागिन' हे गाणे शनिवारीच रिलीज करण्यात आले. काही काळ बॉलिवूडपासून दूर राहिल्यानंतर हनीने मागच्या वर्षी 'भूल भुलैया 2' या गाण्याने पुनरागमन केले. यावर्षी अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीच्या 'सेल्फी' चित्रपटातही त्याचे एक गाणे गायले होते.

हनीवर त्याच्या गाण्यांच्या लिरीक्सवरुन बरीच टीका होते आहे. त्याची गाणी 'मिसॉगीनी'ला(महिलांविषयी द्वेष) प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्याच्यावर अनेकदा करण्यात आला आहे. याबाबत हनी सिंगला विचारण्यात आले असता, त्याने असे कधीच जाणूनबुजून केले नसल्याचे म्हटले आहे.

पिंकविलाशी बोलताना हनी म्हणाला की, मी कधीही जाणूनबुजून वाईट लिरीक्स लिहिले नाही. तसे असते तर लोक माझे गाणे का ऐकतात? जर माझ्या गाण्यांमध्ये घाण शब्द असते, तर मला लोक त्यांच्या मुलीच्या लग्नात गायला का बोलवतात? मी गेल्या 15 वर्षात अनेक लग्नसोहळ्यांमध्ये परफॉर्म केले आहेत. महिला माझ्यासोबत स्टेजवर 'आंटी पुलिस बुला लेगी' या गाण्यावर नाचतात, असे हनी म्हणाला.

आपला मुद्दा मांडत हनीने 'करण अर्जुन'मधील 'मुझको राणा जी माफ करना' या गाण्याचा उल्लेख केला. त्यावेळी लोकांचा या गाण्यावर कोणताही आक्षेप नव्हता असे तो म्हणाला. आजकाल लोक खूप संवेदनशील झाले आहेत. आजचे लोक कोणत्याही गोष्टीचा चुकीचा अर्थ काढतात. पूर्वीची माणसे अधिक बुद्धीवादी होती, बौद्धिक असणे आणि सुशिक्षित असणे यात फरक आहे, असेही हनी म्हणाला.

टॅग्स :हनी सिंहबॉलिवूड