रॅपर यो यो हनी सिंह म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईत. कामाच्या बाबतीत यो योला कुठलीही तडजोड मान्य नाही. लवकरच हनी ‘जोरावर’ या पंजाबी रोमॅन्टिक अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे हनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करतो आहे. साहजिकच, चित्रपटाबद्दल तो कमालीचा उत्सुक आहे. हीच उत्सुकता त्याच्या कामातही झळकत आहे. अगदी अंग तापाने फणफणत असतानाही हनीने ‘जोरावर’चे शूटिंग शेड्युल पूर्ण केले. त्याचे झाले असे की, चित्रपटाच्या टीमला डरबन मूसामभिदा स्टेडियममध्ये एक अॅक्शन दृश्याचे शूटिंग पूर्ण करायचे होते. या शूटसाठी हनी प्रचंड उत्साहित होता, परंतु तो अचानक आजारी पडला. हनी आजारी असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. चित्रपटाचे दिग्दर्शक विनिल यांनी सांगितले की, ‘हनीच्या अंगात ताप होता. मात्र, तरीही शूट न थांबवता हनीने पहिला अॅक्शन सीन पूर्ण केला. कारण आम्हाला केवळ दोन तासांसाठी स्टेडियम मिळाले होते. त्या दोन तासांत आम्हाला आमचे शूट पूर्ण करायचे होते, हे हनी जाणून होता. डरबनमध्ये शूट होते. त्यामुळे तिथे प्रचंड कडाक्याची थंडी होती. मात्र, अशा प्रतिकूल स्थितीतही हनीने काम न थांबवता, ते पूर्ण केले. जेव्हा-केव्हा ब्रेक मिळायचा, तेव्हाच हनी आराम करायचा. साहजिकच, हनीची कामाबद्दलची ही समर्पक वृत्ती पाहून चित्रपटाचे क्रू मेंबर्स इंम्प्रेस झाले नसतील तर नवल!!’ पीटीसी मोशन पिक्चर्स, राजी एम शिंदे व रवींद्र नारायणद्वारा निर्मित, तसेच विनिल मार्कनद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात पारूल गुलाटी, गुरबानी न्यायाधीश, पवन मल्होत्रा, मुकुल देव आणि अचिंत कौर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या ६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
भर तापातही हनीचे शूटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 04:06 IST