Join us

व्हॅम्पायर आणि वेअरवुल्फच्या जगातील अद्भुत सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 17:34 IST

व्हॅम्पायर चित्रपटाच्या चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. प्रसिद्ध ‘अंडरवर्ल्ड’ सिरीजमधील पाचवा चित्रपट ‘अंडरवर्ल्ड : ब्लड वॉर्स’ २ डिसेंबर ...

व्हॅम्पायर चित्रपटाच्या चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. प्रसिद्ध ‘अंडरवर्ल्ड’ सिरीजमधील पाचवा चित्रपट ‘अंडरवर्ल्ड : ब्लड वॉर्स’ २ डिसेंबर रोजी भारतामध्ये प्रदर्शित होत आहे. यापूर्वी २०१२ मध्ये आलेल्या ‘अंडरवर्ल्ड : अवेकनिंग’चा तो सिक्वेल असेल. वेअरवुल्फ आणि व्हॅम्पायरचा घमासान संघर्ष यामध्ये पाहायला मिळणार यात काही शंका नाही.सिनेमात ‘डेव्हिड’ नावाचे पात्र साकारणारा अभिनेता थिओ जेम्सने स्वत:चे पात्र आणि एकंदर चित्रपटाविषयी सविस्तर सांगितले.* तुझे पात्र ‘डेव्हिड’ विषयी काय सांगशील?‘अंडरवर्ल्ड’ सिरीजमधील हा माझा दुसरा चित्रपट आहे. पुन्हा एकदा व्हॅम्पायरच्या विश्वाची सफर घडणार म्हणून मी खूप एक्सायटेड आहे. मी साकारत असलेला ‘डेव्हिड’ तरुण आणि नव विचारांचा व्हॅम्पायर आहे. वडिलांच्या एकाधिकारशाहीला त्याचा विरोध आहे. जुन्या परंपरा, चाली-रीती तो मानत नाही. मुख्य म्हणजे तो सिनेमाची हिरोईन ‘सेलिन’चा (केट बेकिन्सेल) विश्वासू असून तिला सर्वोतोपरी मदत करण्यास सदैव तत्पर असतो.* भूमिके साठी तुला विशेष तयारी करावी लागली?डेव्हिड काही कुशल योद्धा नाही. तो साधा-सरळ आणि तर्काने वागणारा व्हॅम्पायर आहे; परंतु माझ्या वाट्याला काही अ‍ॅक्शन सिक्वेन्स असल्यामुळे मला थोडी फार शारीरिक मेहनत घ्यावी लागली. फार विशेष असे काही नाही.द यंग व्हॅम्पायर : डेव्हिडच्या भूमिकेत थिओ जेम्स* ‘ब्लड वॉर’ म्हणजे नेमके काय आहे?वारसहक्काची ही लढाई आहे. ‘सेलिन’चे रक्त शक्तीचा स्रोत असल्याने सर्वजण तिच्या मागे लागले आहेत. कारण तिचे रक्त मिळाले तर तुम्ही सर्वशक्तिमान होणार. त्यातून उद्भवणारा संघर्ष म्हणजे ‘ब्लड वॉर’.* मग या ‘वॉर’मध्ये जबदस्त अ‍ॅक्शन असणार?चित्रपटात तुफान अ‍ॅक्शन आहे. भाले-तलवारीच्या युद्धाचा सिक्वेन्स तर कमालच झाला आहे! मध्ययुगात जसे युद्ध होत असतील अगदी तशाच लढाया आम्ही चित्रित केल्या आहेत. सुदैवाने खरचटण्याव्यतिरिक्त मला मोठी जखम झाली नाही.* यावेळी सेलिनसमोर कोणता धोका असणार?व्हॅम्पायर आणि वेअरवुल्फचा संघर्ष तर शतकानुशतके चालत आलेला आहे. आतापर्यंत सेलिनने अनेक धोके पार केलेले आहेत. तिच्या प्रवासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा अडथळा या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. तो काय आहे ते सिनेमा पाहिल्यावरच कळेल. तिच्या रक्तासाठी हा ‘व्हिलेन’ हात धुवून तिच्या मागे लागला आहे.व्हॅम्पायट वॉरियर्स : केट बेकिन्सेल (सेलिन) आणि थिओ जेम्स (डेव्हिड)* म्हणजे व्हॅम्पायर विश्व अधिक विस्ताराने दाखवले जाणार तर...हो. व्हॅम्पायर त्यांच्या दैनंदिन आयुष्यात कसे जगतात, कसे वागतात, त्यांची समाजव्यवस्था कशी असते हे सर्व या सिनेमात दिसेल. तसेच विविध पात्रांच्या प्रेम कहाण्यासुद्धा यामध्ये आहेत.* कोणती प्रेम कहाणी?अ‍ॅक्शनबरोबरच प्रेमसंबंध, प्रेमाचा हळुवारपणादेखील चित्रपटाचे मुख्य आकर्षण असणार आहे. व्यक्ती असो वा प्राणी किंवा व्हॅम्पायर, प्रेमाशिवाय त्यांचे अस्तित्व अपूर्ण आहे. सुरुवातीपासूनच ‘अंडरवर्ल्ड’ चित्रपटांमध्ये प्रेमाचा वावर राहिलेला आहे. ‘ब्लड वॉर’मध्येसुद्धा ते अत्यंत मजेशीर पद्धतीने दिसेल.* सिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?कल्पनाविलास आणि मनोरंजनाचे उत्तम मिश्रण म्हणजे ‘अंडरवर्ल्ड’ सिरीज. खऱ्याखुऱ्या जगापासून काही तरी हटके काम करायला मिळते म्हणून मी खूप आनंदी आहे.* केट आणि दिग्दर्शक अ‍ॅना फार्स्टरबद्दल काय सांगशील?केट म्हणजे या सिनेमाचा कणा आहे. केवळ तिच्यामुळे ही सिरीज अद्याप सक्रीय आहे. तिच्यासोबत काम करणे नेहमीच विलक्षण अनुभव असतो. एक अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणून ती खूप चांगली आहे. अ‍ॅनाबद्दल सांगायचे तर सर्व सिनेमा तिच्या डोक्यात आधीच तयार असतो. तिची कल्पनाशक्ती भन्नाट आहे. सिनेमाचा गॉथिक-मध्ययुगीन टोन सेट करण्यात ती यशस्वी ठरली आहे.