Join us

देव पटेलला काय वाटते ट्रम्पबद्दल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 16:43 IST

डोनल्ड ट्रम्पवर सध्या जगातून टीकटिपण्णी होत असताना देव पटेलला जेव्हा याबाबत विचारण्यात आले तेव्हा या पठ्ठ्याने अत्यंत चलाखीने मधला ...

डोनल्ड ट्रम्पवर सध्या जगातून टीकटिपण्णी होत असताना देव पटेलला जेव्हा याबाबत विचारण्यात आले तेव्हा या पठ्ठ्याने अत्यंत चलाखीने मधला रस्ता पकडत ‘सेफ गेम’ खेळला. ‘लायन’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहअभिनेता म्हणून गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये नामांकित पटेल म्हणाला की, मी फार आशावादी माणूस आहे. येणाऱ्या काळातही सर्व काही चांगले घडेल यावर माझा विश्वास आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली नेमके  काय बदल होणार हे येणारा काळच सांगू शकेन.आठ वर्षांपूर्वी ‘स्लमडॉग मिलेनेयर’ या आॅस्कर विजेत्या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर देवने कधी मागे वळूनच पाहिले नाही. त्याला मिळालेल्या यशाबद्दल तो आजही विनम्रतेने बोलतो. तो म्हणतो, ‘स्लॅमडॉग’मध्ये काम करायला मिळणे ही खरंच भाग्याची गोष्ट होती. मी कोणत्या मोठ्या संस्थेत अभिनयाचे प्रशिक्षण घेतले नाही. मी स्वत:ला ग्रेट अ‍ॅक्टरही मानत नाही. काही जण तर मला एकदम खराब अभिनेता म्हणत असतील. पण मला मिळालेल्या संधीचे सोन करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करतो.देव पटेलचे सगळे बालपण लंडनमध्ये गेले. त्याविषयी तो म्हणतो, ‘लंडनसारख्या शहरात राहिल्यामुळे नक्कीच फायदा मिळतो. पण चित्रपटांच्या निमित्ताने का होईना मला भारतात राहायला आणि त्याचे दर्शन जगाला घडविता येत असल्यामुळे खूप समाधान वाटते. माझ्या आईवडिल व आजीआजोबांमुळे मी भारताशी नेहमीच कनेक्टेड राहिलो.’‘लायन’ चित्रपटामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समीक्षकांनी त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. ७४व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये त्याला नॉमिनेशनही मिळाले परंतु तो जिंकू शकला नाही. सरू ब्रिअर्ली लिखित ‘अ लाँग वे होम’ नावाच्या पुस्तकावर तो आधारित असून ही एक सत्यकथा आहे. कोलकात्यातील सरू नावाचा ५ वर्षीय मुलगा अपघाताने हरवल्यावर त्याला आॅस्ट्रेलियन दाम्पत्य दत्तक घेऊन आॅस्ट्रेलियाला घेऊन जाते. भारतात मागे राहिलेल्या मूळ कुटुंबाला भेटण्यासाठी मग सुरू होता त्याचा अवघड शोधप्रवास. ‘गुगल अर्थ’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून तो घर शोधू लागतो. या प्रवासात त्याला येणारे अनुभवांचे दर्शन म्हणजे हा चित्रपट आहे.