टॉम हॉलॅँडला स्टंट डबलमध्येच दिसले रोबर्ट दौनीचे रूप!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 19:07 IST
‘स्पायडर मॅन’ प्रसिद्ध सीरिजमधील आगामी ‘स्पायडर मॅन’ या चित्रपटात नव्या स्पायडर मॅनच्या भूमिकेत झळकणारा टॉम हॉलॅँड प्रेक्षकांच्या मनाचा ठाव ...
टॉम हॉलॅँडला स्टंट डबलमध्येच दिसले रोबर्ट दौनीचे रूप!!
‘स्पायडर मॅन’ प्रसिद्ध सीरिजमधील आगामी ‘स्पायडर मॅन’ या चित्रपटात नव्या स्पायडर मॅनच्या भूमिकेत झळकणारा टॉम हॉलॅँड प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास सज्ज झाला आहे. सपासप जाळे विणून या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर उडणारा स्पायडर मॅन बच्चे कंंपनीचा जबरदस्त फेव्हरेट आहे. आता तो नव्या रूपात प्रेक्षकांच्या समोर जाणार असल्याने त्यातील थरार आणि जोश आतापर्यंतच्या चित्रपटांच्या तुलनेत अधिक असेल. हा चित्रपट येत्या ७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आयर्न मॅन म्हणून ओळखला जाणारा रोबर्ट दौनी याचा चित्रपटातील अंदाज बघण्यासारखा असेल. वास्तविक यापूर्वी रोबर्ट दौनी आणि टॉम हॉलॅँड यांनी एका चित्रपटात आयर्न मॅन आणि स्पायडर मॅनची भूमिका साकारली आहे. आता पुन्हा हे दोघे याच अंदाजात बघावयास मिळणार असल्याने प्रेक्षकांना त्याविषयी प्रचंड आतुरता आहे. टॉमला जेव्हा रोबर्टशी झालेल्या पहिल्या भेटीविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, रोबर्टची भेट घेण्याअगोदर मला थोडीशी चिंता वाटत होती. कारण मी रोबर्ट दौनीचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे जेव्हा तो समोर आला तेव्हा त्याच्याशी काय बोलावे हे मला सुचलेच नाही. मी त्याच्याशी बोलत होतो. परंतु काही वेळानंतर मला असे समजले की, मी ज्या व्यक्तीशी बोलत आहे तो रोबर्ट दौनी नसून, त्याचा स्टंट डबल आहे. मला त्याच्यात रोबर्टचेच रूप दिसले. मला अजिबातच समजले नाही की, हा रोबर्ट दौनी नसून त्याचा स्टंट डबल आहे. पण काहीही असो आमची ही भेट कायमस्वरूपी स्मरणात राहील, असेही टॉमने सांगितले.