सनी म्हणतोय, निकोल किडमॅन माझ्या आईसारखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 22:20 IST
भारतीय बालकलाकार सनी पवार म्हणतोय की, ‘लॉयन’ या सिनेमातील त्याची सहअभिनेत्री निकोल किडमॅन त्याला त्याच्या आईसारखी वाटत होती. समीक्षकांनी ...
सनी म्हणतोय, निकोल किडमॅन माझ्या आईसारखी
भारतीय बालकलाकार सनी पवार म्हणतोय की, ‘लॉयन’ या सिनेमातील त्याची सहअभिनेत्री निकोल किडमॅन त्याला त्याच्या आईसारखी वाटत होती. समीक्षकांनी या सिनेमाचे जबरदस्त कौतुक केले असून, सनी आणि निकोल यांनी त्यांच्या भूमिकांना न्याय दिल्याचे म्हटले आहे. ‘लॉयन’ या हॉलिवूडपटात आठ वर्षीय सनी पवार हा अभिनेत्री निकोल किडमॅन हिच्या मुलाच्या भूमिकेत आहे. याविषयी सनीने सांगितले की, आॅस्कर विजेत्या अभिनेत्रीसोबत काम करताना त्यांच्याशी एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. डेलीमेल डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सनीने म्हटले की, सेटवर निकोल यांनी मला माझ्या सख्या आईसारखे प्रेम दिले. त्या मला खूप जीव लावला. त्या खूपच मोकळ्या स्वभावाच्या आहेत. निकोल मला नेहमीच म्हणायच्या की, तू नेहमी सत्य बोलतोस अन् तुला असे बोलायला हवे. शूटिंगदरम्यान निकोलसोबत सनी क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेत होता. मुंबई बॉय असलेल्या सनीने हजारो मुलांना मागे टाकत निकोलसोबत काम करण्याची संधी प्राप्त केली होती. सनीने निकोलला थोडीशी हिंदी भाषाही शिकवली. ‘लॉयन’ या सिनेमात रूनी मारा आणि भारतीय वंशाचा ब्रिटिश अभिनेता देव पटेल याच्यासह दिप्ती नवल, तनिष्ठा चॅटर्जी, प्रियंका बोस आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकार आहेत. हा सिनेमा भारतात २४ फेब्रुवारी रोजी रिलिज होणार आहे. सिनेमाची शूटिंग कोलकाता आणि आॅस्ट्रेलिया येथे करण्यात आली आहे. गार्थ डेविस यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात एका पाच वर्षीय भारतीय मुलाची कथा दाखविण्यात आली आहे. जो हजारो किलोमीटर दूर असलेल्या कोलकात्याच्या रस्त्यावर हरवतो. पुढे एक आॅस्ट्रेलियन दाम्पत्य त्याला दत्तक घेते. त्यानंतर २५ वर्षांनतर तो त्याच्या परिवाराचा शोध घेण्यासाठी निघतो.