Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेश बत्राच्या ‘द सेन्स आॅफ अ‍ॅन एंडिंग’चा वैचारिक ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 17:43 IST

रितेश बत्रा दिग्दर्शित व मॅन बुकर पुरस्कार विजेता लेखक ज्युलियन बार्न्स लिखित कादंबरीवर आधारित चित्रपट ‘द सेन्स आॅफ अ‍ॅन एंडिंग’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. जिम ब्रॉडबेंट आणि शार्लेट रॅम्पलिंग हे प्रमुख भूमिकेत आहेत.

‘लंचबॉक्स’ या जागतिक पातळीवर नावाजलेल्या सिनेमानंतर दिग्दर्शक रितेश बत्राकडून सर्वांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. त्याचा आगामी चित्रपट ‘द सेन्स आॅफ अ‍ॅन एंडिंग’चे पहिले ट्रेलर नुकतेच इंटरवर दाखल झाले आणि चित्रपटरसिकांचे कुतूहल वाढवण्यात ते यशस्वी ठरले.सत्याचा शोध आणि आपल्या आयुष्याची अपूर्ण कथाच आपल्याला का लक्षात राहते याचा मागोवा या चित्रपटात घेण्यात आला आहे. याच नावाच्या मॅन बुकर पुरस्कार प्राप्त व ज्युलियन बार्न्स लिखित कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.जिम ब्रॉडबेंट प्रमुख भूमिकेत असून हॅरिएट वॉल्टर, मिशेल डॉकरी आणि शार्लेट रॅम्पलिंग अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे. ही गोष्ट आहे वयोवृद्ध टोनी वेबस्टरची (ब्रॉडबेंट). शांत, निरुपद्रवी आणि एकाकी अस्तित्त्व राखणाऱ्या टोनीच्या भूतकाळातील विस्मृतीत गेलेले अनेक रहस्य त्याच्या समोर पुन्हा येऊन त्याच्या तारुण्यातील अस्पष्ट आठवणी जिवंत करतात.                            त्याचे पहिले प्रेम आणि त्याकाळात घेतलेल्या निर्णयांचा नंतरच्या आयुष्यावर पडेलेल्या परिणामांचा जेव्हा तो पुन्हा नव्याने विचार करू लागतो तेव्हा त्याची होणारी घुसमट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘असे किती वेळा घडते की, आपल्या जीवनाची कहाणी आपण आपल्या सोयीनुसार सांगून तिला एक नवीन रुप देण्यात यशस्वी होतो?’ असे ब्रॉडबेंटचे पात्र ट्रेलरमध्ये म्हणते.पुरस्कार विजेता पटकथाकार निक पेनने या चित्रपटाचा स्क्रीनप्ले लिहिलेला आहे. यामध्ये एमिली मॉर्टिमर, बिली हॉवले, जोई अ‍ॅल्विन, फ्रेया मेव्हर आणि मॅथ्यू गूड यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.‘ब्रिजेट जोन्स बेबी’ आणि ‘द लिजेंड आॅफ टारझन’ य चित्रपटांतून झळकलेला ब्रॉडबेंट यानंतर ‘गेम्स आॅफ थ्रोन्स’च्या सातव्या सीझनमध्ये व ‘ब्लॅक ४७’ या चित्रपटात दिसणार आहे. येत्या १० मार्च रोजी हा चित्रपट इंग्लंडमध्ये रिलीज होणार आहे.