Join us  

‘अमर अकबर ॲन्थनी’चा रिमेक इंग्लंडमध्ये?; अमिताभच्या भूमिकेत कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 6:41 AM

या दोन्ही गोष्टींसाठी भारतीय किती वेडे आहेत, हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे.

बॉलीवूड आणि क्रिकेट... भारतात या दोन गोष्टी अशा आहेत, त्या जर लोकांना मिळाल्या, तर त्यापेक्षा अधिक त्यांना काहीही नको असतं, इतक्या या गोष्टी त्यांच्या जीव की प्राण आहेत. त्यासाठी आपला जीव ओवाळून टाकायलाही ते तयार असतात. त्यामुळेच गाजत असणाऱ्या आणि अडचणीच्या कोणत्याही विषयावरून लोकांचं लक्ष जर दुसरीकड वळवायचं असेल तर चित्रपट आणि क्रिकेट या गोष्टींचा कायम आधार घेतला जातो. त्या जोडीला आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे धर्म... पण, चित्रपट आणि क्रिकेट या दोन गोष्टी भारतीय माणसाला मुळातूनच आवडतात. त्यामुळेच चित्रपट कलावंत आणि क्रिकेटपटू यांची क्रेझही भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. 

या दोन्ही गोष्टींसाठी भारतीय किती वेडे आहेत, हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या हीरोचा सिनेमा लागला किंवा आपला आवडता क्रिकेटपटू बॅटिंगला आला की त्याचे चाहते लगेच स्क्रीनला चिकटून बसतात. त्या-त्या काळाप्रमाणे आणि वयाप्रमाणे अनेकांचे आवडते हीरो आणि हिरोइनही असतात. काही गाजलेले चित्रपटही रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवत असतात. १९८०च्या दशकात आलेला ‘अमर अकबर ॲन्थनी’ हा चित्रपट आठवतोय? त्या काळात अतिशय गाजलेला हा चित्रपट. लहानपणी हरवलेल्या तीन सख्ख्या भावांच्या आयुष्यावर ही कहाणी बेतलेली आहे. हे तिन्ही भाऊ लहानपणी परिस्थितीमुळे एकमेकांपासून दुरावतात, तीन वेगवेगवेळ्या धर्मांचे लोक त्यांचा सांभाळ करतात आणि नंतर मोठेपणी ते पुन्हा एकत्र येतात अशी ही कहाणी...हिंदू धर्मीय कुटुंबात लहानाचा मोठा झालेला विनोद खन्ना नंतर एक पोलिस अधिकारी बनतो, मुस्लीम कुटुंबात वाढलेला ऋषी कपूर कव्वाली गायक बनतो, तर ख्रिश्चन कुटुंबात वाढलेला अमिताभ बच्चन मद्य विक्रेता बनतो. तिघांनीही आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत आणि लोकांना जो पाहिजे तो सारा मसाला चित्रपटात असल्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाल केली होती. १९७७ या वर्षी बॉलीवूडची सर्वाधिक कमाई करणारा तो चित्रपट ठरला होता! धार्मिक सहिष्णुतेचा विषय तर चित्रपटात होताच, शिवाय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं आणि आनंद बक्षी यांनी गीतं लिहिली होती... असा सगळा मसाला या चित्रपटात खच्चून भरलेला असल्यानं अशा प्रकारच्या चित्रपटांची बॉलीवूडमध्ये लाटच आली होती.

तुम्ही म्हणाल, ‘अमर अकबर ॲन्थनी’ या इतक्या जुन्या चित्रपटाची तुम्हाला आत्ताच आठवण का आणि कशासाठी आली? त्याचंही एक ताजं कारण आहे. बॉलीवूडची कहाणी आणि बॉलीवूडचे डायलॉग चाहते सहजासहजी विसरत नाहीत. शिवाय हे चाहते फक्त भारतातच आहेत असंही नाही, तर ते जगभर पसरलेले आहेत. आता हेच पाहा ना... लंडनचे महापौर आहेत मूळ भारतीय वंशाचे सादिक खान. खरं तर ते मूळचे पाकिस्तानचे. १९७०च्या दशकात त्यांचे आई-वडील पाकिस्तानातून लंडनला आले आणि तिथेच स्थायिक झाले. या सादिक खान यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य केवळ इंग्लंडमध्येच नाही, तर भारत आणि पाकिस्तानातही खूपच व्हायरल झालं. सादिक खान असं म्हणाले तरी काय? वृत्त माध्यमांच्या हवाल्यानं सादिक खान म्हणाले, माझ्याकडे बॉलीवूडसाठी एक अतिशय उत्तम असा प्रस्ताव आहे. बॉलीवूडनं हा प्रस्ताव अमलात आणला तर केवळ बॉलीवूड, भारत, किंवा इंग्लंडच नव्हे, तर अख्ख्या जगासाठी ती अभिमानाची गोष्ट ठरेल... ‘अमर अकबर ॲन्थनी’ हा चित्रपट भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. आज आई-बाबांच्या पिढीत असलेल्या लोकांना तर हा चित्रपट चांगलाच माहीत आहे. बॉलीवूडनं या चित्रपटाचा आता इंग्लंडमध्ये रिमेक केला पाहिजे... कारण जुन्या चित्रपटातल्या भूमिका तर त्या-त्या कलावंतांनी केल्या होत्या, पण आमच्याकडे मात्र या चित्रपटात काम करण्यासाठी खरोखरच्याच व्यक्ती आहेत. 

आम्हाला त्यासाठी दुसऱ्या कलावंतांची गरज नाही. आमच्याकडे एक ख्रिश्चन राजा (किंग चार्ल्स थ्री), एक मुस्लीम महापौर (मी स्वत:) आणि एक हिंदू पंतप्रधान (ऋषी सुनक) आहे. त्यामुळे या चित्रपटात भूमिका करण्यासाठी आम्हाला कलावंतांची गरज नाही, त्यात आम्ही स्वत:च काम करू!

‘अमिताभची भूमिका मी करेल!’ सादिक खान हसत हसत सांगतात, या चित्रपटात अमिताभ बच्चनची भूमिका साकारण्याची संधी मला मिळू शकेल... सादिक खान यांच्या वक्तव्यातून बॉलीवूडप्रती असलेलं त्यांचं प्रेम तर दिसतंच, पण भारतीयांविषयीही त्यांना किती आत्मीयता आहे, तेही कळतं. सादिक खान सांगतात, लंडन हे जगातील महान शहरांपैकी एक आहे, कारण असंख्य भारतीयांनी या शहराला आपलं घर मानलं आहे!

टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चन