पोर्तु रिकोची १९ वर्षांची स्टेफनी ठरली ‘मिस वर्ल्ड २०१६’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 12:42 IST
पोर्तु रिकोची १९ वर्षांची स्टेफनी डेल व्हॅले ही यावर्षीची ‘मिस वर्ल्ड’ ठरली आहे. डोमिनिकन रिपब्लिक आणि इंडोनेशियासह जगभरातील सौंदर्यवतींना ...
पोर्तु रिकोची १९ वर्षांची स्टेफनी ठरली ‘मिस वर्ल्ड २०१६’
पोर्तु रिकोची १९ वर्षांची स्टेफनी डेल व्हॅले ही यावर्षीची ‘मिस वर्ल्ड’ ठरली आहे. डोमिनिकन रिपब्लिक आणि इंडोनेशियासह जगभरातील सौंदर्यवतींना मागे टाकत स्टेफनीने हा किताब पटकावला. ‘मिस वर्ल्ड २०१६’ च्या स्पर्धेत डॉमिनिकन रिपब्लीकची यारित्झा मिग्युलिना रेज रमिरेझ ही पहिली उपविजेती तर इंडोनेशियाची नताशा मॅन्युला ही दुसरी उपविजेती ठरली.आॅक्सन हिल, मेरीलॅण्ड, अमेरिका येथे ही स्पर्धा झाली. प्रियदर्शनी चॅटर्जी हिने या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. गत वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकलेल्या स्पेनच्या मेरिया लालागुना हिच्याहस्ते डेल व्हॅलेला मिस वर्ल्डचा मुकूट चढवला गेला.डेल व्हॅलेला स्पॅनिश, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषा अवगत आहेत. विजयानंतर डेल व्हॅलेचा आनंद गगनात मावत नव्हता. माझी जन्मभूमीचे म्हणजेच कॅरेबियनचे प्रतिनिधीत्व करताना माझ्यावर एक जबाबदारी होती. मी ती जबाबदारी पूर्ण केली, याचा मला अभिमान आहे. माझ्या जन्मभूमीचे प्रतिनिधीत्व करण्याचा सन्मान मला मिळावा, हे माझे भाग्य आहे, असे ती म्हणाली. ‘जगात तुला काही बदल घडवून आणण्याची संधी मिळाली तर तू काय करशील’, असा प्रश्न अंतिम फेरित स्टेफनीला विचारण्यात आला. यावर स्टेफनीने अतिशय मार्मिक उत्तर दिले. जग बदलण्याची संधी मिळाल्यास मी गरजूंना मदत करण्यासोबत समानसंधी व समान न्यायाचे महत्त्व पटवून देईल,असे ती म्हणाली. १९७५ साली कॅरेबियन आयलँडच्या विल्नेलिया मर्सेडने हा किताब पटकाविला होता. त्यानंतर मिस वर्ल्डचा किताब पटकाविणारी डेल व्हॅले ही दुसरी कॅरेबियन सौंदर्यवती आहे. मिस फिलीपिन्स कैट्रीओना एलिसा ग्रे आणि मिस केनिया एवलिन एनजाम्बी यांनी अंतिम फेरीत शेवटच्या पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते. जगभरातून ११७ सौंदर्यवतींनी ‘मिस वर्ल्ड २०१६’मध्ये सहभाग घेतला होता. टॉप २० स्पर्धकांमध्ये चीन, केनिया, बेल्जियम, घाना, फिलीपिन्स, कुक आयलँड, मंगोलिया, इंडोनेशिया, फ्रान्स, अमेरिका, भारत, स्लोवाकिया, कोरिया, हंगेरी, डॉमिनिकन रिपब्लीक, जपान, ब्राझील, थायलंड, आॅस्ट्रेलिया, पोर्तु रिको या देशांच्या सौंदर्यवतींनी स्थान मिळवले होते. प्रियदर्शनी चॅटर्जी हिने या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. प्रियदर्शनीने ‘मिस इंडिया वर्ल्ड २०१६’हा खिताबही जिंकला आहे. 'मिस इंडिया वर्ल्ड' याचे विजेतेपद बॉलिवूडच्या किंगने म्हणजेच शाहरुख खानने घोषित केले होते. या फेमिना मिस इंडियाचे आयोजन मुंबईतल्या यशराज स्टुडिओमध्ये करण्यात आले होते.