अॅँड्र्यू गारफिल्ड अन् एमा स्टोनमध्ये पुन्हा फुलले प्रेमांकुर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 22:18 IST
अभिनेता अॅँड्र्यू गारफिल्ड आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री एमा स्टोन यांच्यात पुन्हा एकदा प्रेमांकुर फुलत असल्याचे बघावयास मिळत आहेत. ...
अॅँड्र्यू गारफिल्ड अन् एमा स्टोनमध्ये पुन्हा फुलले प्रेमांकुर
अभिनेता अॅँड्र्यू गारफिल्ड आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री एमा स्टोन यांच्यात पुन्हा एकदा प्रेमांकुर फुलत असल्याचे बघावयास मिळत आहेत. खुद्द अॅँड्र्यू गारफिल्ड यानेच या वृत्ताला दुजोरा दिला असून, त्याच्या मते आमच्यातील प्रेमसंबंध आजही कायम आहेत. हेल्लोमॅगजीन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार गारफिल्डने नुकताच वॅनिटी फेयर्स लिटिल गोल्ड मॅन पोडकास्टला मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने दोघांमधील प्रेमसंबंधांबाबतचा खुलासा केला. गारफिल्डने सांगितले की, आमच्यात जरी ब्रेकअप झाले असले तरी, एकेमेकांप्रतीचे प्रेम तसुभरही कमी झालेले नाही. आम्ही नेहमीच एकमेकांची चिंता करीत असतो. कदाचित हे आमच्यातील प्रेमामुळे घडत असावे. आमच्यात एकमेकांप्रती प्रेम आणि आदर आहे. शिवाय एक कलाकार म्हणून मी तिचा खूप मोठा फॅन असल्याने तिच्यावर प्रेम करणे माझा अधिकार आहे. मीच नव्हे तर एमा स्टोनदेखील माझ्यावर जिवापाड प्रेम करतेय. याची मला तिने पावलोपावली जाणीवही करून दिली आहे. पुढे बोलताना अॅँड्र्यू गारफिल्डने (३३) सांगितले की, एमा यशाचे शिखर सर करीत असल्याने मी खूप समाधानी आहे. तिच्या करिअरची वाटचाल माझ्यासाठी आनंददायी असून, मी यासाठी तिचे नेहमीच समर्थन करीत राहणार आहे. ती देखील मला नेहमीच समर्थन देत असते. कदाचित इतरांना ही बाब लक्षात येणार नाही, तसेच आमच्यावर टीका करण्याची संधीही कोणी सोडणार नाही, परंतु आम्ही आमच्यातील प्रेम आयुष्यभर कायम ठेवणार आहोत. एमासोबतचे संबंध तोडणे माझ्यासाठी खरोखरच दु:खदायक होते. परंतु मला असे वाटते की, मी तिच्यापासून कधीच दूर गेलो नाही. शिवाय तिच्याप्रतीचे प्रेमही कमी झाले नसल्याचा अॅँड्र्यू गारफिल्ड याने खुलासा केला.