Join us  

Oscars 2024: रेड कार्पेटवर पाय अडकून पडली अभिनेत्री; मस्करीत म्हणाली, 'मी विमा काढलाय'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:09 PM

रेड कार्पेटवर पडल्यानंतर तिने स्वत:ला सांभाळलं आणि स्वत:च मस्करी करत म्हणाली...

oscars 2024: जगातील सर्वात प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. जगभरातील सर्वच सिनेप्रेमींचं, कलाकारांचं या पुरस्कार सोहळ्याकडे लक्ष असतं. प्रत्येक कलाकाराची ऑस्कर मिळवण्याची इच्छा असतेच. यंदा हॉलिवूड सिनेमा 'ओपनहायमर' ने बाजी मारली. सिनेमाने अनेक कॅटेगरीत पुरस्कार पटकावले. दरम्यान अनेक सेलिब्रिटी पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. रेड कार्पेटवर त्यांची रेलचेल होती. तेवढ्यात एक अभिनेत्री ड्रेसमध्ये पाय अडकून पडली. यानंतर तिने दिलेली प्रतिक्रिया फारच मजेशीर होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अकादमी पुरस्कार प्रदान सोहळ्याआधी अनेक सेलिब्रिटींना ग्लॅमरस लूकमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली. याचवेळी २७ वर्षीय अभिनेत्री लीझा कोशी (liza  ड्रेसमध्ये पाय अडकून पडली. यानंतरही तिने ज्याप्रकारे स्वत:ला सावरलं ते कौतुकास्पद होतं. तिने लाल रंगाचा लाँग ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. कॅमेऱ्यासमोर पोज देण्यासाठी येत असतानाच तिचा पाय अडकला आणि ती धाडकन खाली पडली. तरी तिने ही घटना एकदम हुशारीने हँडल केली.  स्वत:च मस्करी करत ती म्हणाली, 'तिथे एक खड्डा होता. तुम्हाला दिसला का?' तिला एकाने ठीक आहेस ना असं विचारलं, यावर ती म्हणाली, 'हो, मी ठीक आहे. मी माझ्या टाचांचा विमा काढला आहे म्हणून बरं.'लीझा कोशीने नंतर पुन्हा या घटनेचा उल्लेख केला आणि म्हणाली, 'मी खूप उत्साहित होते आणि त्याच नादात रेड कार्पेटवर पडले.'

लीझा कोशी प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतच युट्यूबरही आहे. तिचा नुकताच 'प्लेयर्स' सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. याशिवाय तिने 'लिझा ऑन डिमांड','ट्रान्सफॉर्मर्स' सिनेमातही भूमिका केली आहे. तिच्या युट्यूब चॅनलवर १७ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर २१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :ऑस्करसोशल मीडियासोशल व्हायरलहॉलिवूड