Join us

#MeToo : ‘मी १४ वर्षांची होती अन् तो ३६ वर्षांचा होता’, प्रियंका चोपडाच्या को-अ‍ॅक्ट्रेसनी केला लैंगिक शोषणाचा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 14:06 IST

सध्या जगभरात सोशल मीडियावर #MeToo या हॅशटॅगअंतर्गत लैंगिक शोषणाविरोधात एकप्रकारची मोहीम चालविली जात असून, अनेक महिला तथा सेलिब्रिटी त्यांच्यासोबत ...

सध्या जगभरात सोशल मीडियावर #MeToo या हॅशटॅगअंतर्गत लैंगिक शोषणाविरोधात एकप्रकारची मोहीम चालविली जात असून, अनेक महिला तथा सेलिब्रिटी त्यांच्यासोबत झालेल्या या दुष्कार्माची उघडपणे वाच्यता करीत आहेत. आतापर्यंत अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे. आता या यादीत आॅस्कर विजेती अभिनेत्री मार्ली माटलिन हिनेदेखील असा धक्कादायक खुलासा केला आहे. मार्ली नुकतीच अभिनेत्री प्रियंका चोपडासोबत अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको-३’ शी जोडली गेली आहे. मार्लीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, ‘मी १४ वर्षांची होती आणि तो ३६ वर्षांचा होता. मी मुकी असेल पण माझी शांतता हेच माझे शेवटचे कथन आहे जे तुम्ही समजू शकता.’मार्ली हिला तिच्या पहिल्याच ‘चिल्ड्रन आॅफ ए लेसर गॉड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आॅस्कर पुरस्काराने सन्मानित केले. वयाच्या केवळ २१ व्या वर्षी आॅस्कर जिंकणारी मार्ली पहिलीच अभिनेत्री आहे. मार्लीने तिची ही कथा #MeToo या हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर केली. हॉलिवूड अभिनेत्री एलिसा मिलनो हिने सुरू केलेल्या #MeToo या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जगभरातील अनेक महिलांंनी त्यांच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनांचा जाहीरपणे खुलासा केला. या मोहिमेला भारतासह जगभरातील महिलांचे समर्थन मिळत आहे. केवळ महिलाच नव्हे तर काही पुरुषांनीही त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविषयी जाहीरपणे सोशल मीडियावर खुलासा केला. अभिनेत्री एलिसा मिलानो हिने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा खुलासा करताना जगभरातील महिलांना आवाहन केले की, त्यांनीदेखील त्यांचे अनुभव #MeToo या हॅशटॅगअंतर्गत सोशल मीडियावर शेअर करावेत. जेणेकरून इतर महिला अशाप्रकारच्या शोषणाला बळी पडणार नाहीत. भारताविषयी सांगायचे झाल्यास प्रसिद्ध कॉमेडियन मल्लिका दुआ हिने तिच्यासोबत वयाच्या सातव्या वर्षी झालेल्या लैंगिक शोषणाची घटना बिंधास्तपणे सोशल मीडियावर शेअर केली. मल्लिकाच्या या खुलाशानंतर एकच खळबळ उडाली आहे.  दरम्यान, एलिसाने ट्विट करताच जगभरातील महिला #MeToo या हॅशटॅगसह त्यांच्यासोबत झालेल्या या घटना शेअर करीत आहेत. एलिसाच्या ट्विटनंतर आतापर्यंत २७,००० पेक्षा अधिक महिलांनी ट्विट करून त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविषयी जाहीरपणे सांगितले.