Join us
Daily Top 2Weekly Top 5

जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टमध्ये १०० गरीब मुलांना मोफत प्रवेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 22:04 IST

ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक जस्टिन बीबर येत्या १० मे रोजी भारतात येणार असून, मुंबई येथील डी. वाय. पाटील मैदानावर ...

ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक जस्टिन बीबर येत्या १० मे रोजी भारतात येणार असून, मुंबई येथील डी. वाय. पाटील मैदानावर त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. या कॉन्सर्टची तयारी पूर्ण झाली असून, सध्या तिकीट विक्री जोरात सुरू आहे. सर्वच अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणाºया या कॉन्सर्टमध्ये शंभर गरीब मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार असल्याने आयोजकांनी स्पष्ट केले आहे. व्हाइट फॉक्स इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही कॉन्सर्ट जस्टिन बीबर याच्या पर्पस वर्ल्ड टूरअंतर्गत आहे. बीबर पहिल्यांदाच भारतात येत असल्याने त्याच्या भारतीय फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशात शंभर गरीब मुलांना बीबरला जवळून बघता येणार आहे. या शंभर मुलांसाठी स्टेजच्या बाजूलाच बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी या मुलांना फळे आणि जूस दिले जाणार आहे. या कॉन्सर्टचे सर्वाधिक महागडे तिकीट ७५,००० इतके आहे. एवढ्याच किमतीचे एक तिकीट एका टॅक्सीचालकाच्या मुलाला भेट देण्यात आला आहे. कारण हा मुलगा बीबरचा खूप मोठा फॅन असल्याचे बोलले जात आहे. बीबर सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असतो. त्याने अनेक शाळांच्या बांधकामासाठी आर्थिक मदत केली आहे. त्याव्यतिरिक्त लेकेमिया, मेनिन्जाइटिस आणि डाउन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त लोकांनाही तो नेहमीच मदत करीत असतो. दरम्यान, बीबरची ही बहुप्रतीक्षित कॉन्सर्ट १० मे रोजी होणार आहे.