Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बेबी ड्रायव्हर’ चित्रपटात जॉन हम्मचा हटके लुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 14:15 IST

‘मॅड मेन’ या चित्रपटात डॉन ड्रॅपरची उत्कृष्ट भूमिका साकारणारा जॉन हम्म आता त्याच्या आगामी ‘बेबी ड्रायव्हर’ या चित्रपटात पुन्हा ...

‘मॅड मेन’ या चित्रपटात डॉन ड्रॅपरची उत्कृष्ट भूमिका साकारणारा जॉन हम्म आता त्याच्या आगामी ‘बेबी ड्रायव्हर’ या चित्रपटात पुन्हा एकदा अशीच काहीशी हटके भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. आतापर्यंत जॉनने ‘द टाउन’, ‘सकर पंच’, ‘ब्राइड्समॅड्स’ आणि ‘किपिंग अप विथ द जॉनेसेस’ या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याच्या ‘बेबी ड्रायव्हर’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास त्यात त्याने ‘बड्डी’ची भूमिका साकारली आहे. चित्रपटात तो एक बॅँक रॉबर असून, त्याला बेबीसोबत पळून जायचे असते. बेबीच्या भूमिकेत एंसेल एलगोर्ट याने साकारली आहे. जॉन हम्म चित्रपटाविषयी बोलताना म्हणतोय की, हा चित्रपट ग्रॅँड एमजीएम थाटातला नसून, संगीतमय आहे. कारण चित्रपटात ९० टक्के संगीताचा वाटा आहे. संगीतच चित्रपटाच्या कथानकाला वेग देते. तर जॉन हम्म चित्रपटात अगदीच वेगळ्या लुकमध्ये बघावयास मिळणार आहे. त्याचा हा लुक चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक एडगर राइट यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. खरं तर त्यांना स्वत:लाच ही भूमिका साकारायची होती. परंतु त्यांनी या भूमिकेसाठी जॉन हम्मची निवड केली. जॉनला चित्रपटातील मेकओव्हरविषयी विचारले असता तो म्हणाला की, मलाही माहीत नाही की, याला नेमके काय म्हणावे. कारण त्यांनी माझा लुक हटके दिसण्यासाठी माझ्यावर बरेचसे प्रयोग केले. त्यांनी माझ्या डोक्याच्या दोन्ही बाजूचे केस संंपूर्णत: कापले आहेत. तर डोक्याच्या शेंड्यावर केसांचा झुपका ठेवला आहे. खरं तर मागील दशकात मी अशीच केशभूषा ठेवली होती. त्यामुळे पुन्हा तशी केशभूषा ठेवण्याची संधी मिळाल्याने मला सुखद धक्का बसला आहे. पुढे बोलताना जॉन असेही म्हणतो की, केशभूषा बदलल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वावर फारसा फरक पडत नाही. पण, प्रेक्षकांच्या मनात तुमच्याविषयी एक विशिष्ट प्रतिमा असते; त्यामुळे अशाप्रकारचा लुक घेऊन त्यांच्यासमोर गेल्यास तुमच्या प्रतिमेला थोडासा धक्का बसतो. चित्रपटाच्या कथानकाविषयी सांगायचे झाल्यास, एंसेल एलगोर्ट एक हुशार ड्रायव्हर असतो. मात्र, जेव्हा त्याची भेट लिली जेमसोबत होते, तेव्हा त्याच्या मनात गुन्हेगारी सोडून चांगले आयुष्य जगण्याची उमेद निर्माण होते. पण, त्याचा एकेकाळचा गुन्हेगारी जगतातील बॉस (केविन स्पेसी) याला ही गोष्ट कळते. तेव्हा तो त्याच्या आयुष्य, प्रेम आणि स्वातंत्र्यासमोर आव्हान उभे करतो. दरम्यान, ‘बेबी ड्रायव्हर’ या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून एडगर राइट यांनी काम पाहिले आहे, तर जॉन हम्मसोबत एंसेल एलगोर्ट, केविन स्पेसी, लीली जेम्स, जॉन बर्न्थल, इझी गोन्जालेझ आणि जेमी फॉक्स यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.