Join us

हॉलिवूडमधील निर्माते स्टीवन सीगल आता भारतात सिनेमा बनवणार; G7 फिल्म्ससोबत भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 20:53 IST

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता स्टीवन सीगल यांच्या स्टीमरोलर स्टीवन सीगल प्रॉडक्शन्स कंपनीने भारतातील G7 फिल्म्सच्या विकाश वर्मा यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय भागीदारी जाहीर केली आहे.

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता स्टीवन सीगल यांच्या स्टीमरोलर स्टीवन सीगल प्रॉडक्शन्स कंपनीने भारतातील G7 फिल्म्सच्या विकाश वर्मा यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय भागीदारी जाहीर केली आहे. स्टीवन सीगल, डोमिनिक सीगल आणि विकाश वर्मा यांचा भारत आणि अमेरिका यांच्यातील चित्रपटसृष्टीत नव्या संधी निर्माण करणे आणि जागतिक दर्जाचे चित्रपट तयार करणे हा या सहयोगाचा उद्देश आहे. स्टीवन सीगल यांच्या स्टाईलप्रमाणे ॲक्शन आणि थ्रिलर शैलीवर भर दिला जाईल, परंतु या प्रोजेक्ट्समध्ये भारतीय सांस्कृतिक पैलूंनाही महत्त्व दिले जाणार आहे. 

स्टीवन सीगल यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर ही घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले की, स्टीमरोलर स्टीवन सीगल प्रोडक्शन्स आता अधिकृतपणे भारतात दाखल! स्टीवन सीगल आणि डॉमिनिक सीगल यांनी G7 फिल्म्सचे विकाश वर्मा यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे, ज्यामुळे प्रभावी कथा भारतीय प्रेक्षकांसमोर आणल्या जातील. ॲक्शन सिनेमाच्या वारशाला भारतीय चित्रपटसृष्टीत नवी दिशा देण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे.

स्टीवन सीगल यांच्या पोस्टवर विकाश वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की,स्टीवन सीगल आणि डोमिनिक सीगल यांसारख्या दिग्गजांसोबत स्टीमरोलर स्टीवन प्रॉडक्शनमार्फत सहयोग करताना अभिमान वाटतो. विकाश वर्मा आणि अभिनेता ध्रुव वर्मा यांच्यासोबत एकत्र येत, आम्ही अशा कथा साकारत आहोत ज्या ॲक्शन, भावना आणि जागतिक भावनेने भरलेल्या आहेत आणि काळाच्या स्पर्धेत टिकणाऱ्या आहेत. स्टीवन यांच्या पोस्टवर सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कलाकारांच्या प्रतिक्रियासंजय दत्तने एक्स अकाउंटवर या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, ''विकाश वर्मा भाईसाहेब तुम्हाला खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम.'' सुनील शेट्टीने लिहिले की, मोठं पाऊल विकाश!!! या जबरदस्त भागीदारीसाठी हार्दिक अभिनंदन! आता तुझ्या हातून भारतीय पडद्यावर दमदार ॲक्शन पाहायला मिळणार याची आतुरतेने वाट पाहतोय. तुझा अभिमान आहे, आणि त्याहूनही जास्त तुझ्यासाठी उत्साहाने शुभेच्छा देतो! शेखर सुमनने म्हटलं की, देव योग्य लोकांना आणि त्यातल्‍यात सर्वोत्तम व्यक्तींना एका उद्देशाने एकत्र आणतो. ही भागीदारी यश, आनंद आणि आणखी अनेक चांगल्या गोष्टींचा मार्ग खुले करो. नेहमीच शुभेच्छा आणि आशीर्वाद! गुलशन ग्रोव्हरने लिहिले की, माझा मित्र स्टीवन आणि विकाश भाई यांची शक्तिशाली सिनेमॅटिक कंटेंटसाठी झालेली भागीदारी, तरुण ऊर्जा असलेल्या डॉमिनिक सीगल आणि ध्रुव वर्मा यांचे सहकार्य ही एक मोठी बातमी आहे. माझा मुलगा संजय ग्रोव्हर आणि मी तुम्हा सर्वांना यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो! चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी म्हटलं की, अभिनंदन विकाशजी...या नवीन आणि रोमांचक प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा!ही भागीदारी एक भव्य आणि यशस्वी अध्याय ठरो.