Join us  

फ्रेण्ड्स मालिकेतील या कलाकाराचे झाले निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 6:22 PM

F.R.I.E.N.D Series Actor Ron Leibman Died : फ्रेण्ड्स या मालिकेतील या कलाकाराची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

ठळक मुद्देफ्रेण्ड्स या मालिकेतील रॉन लिबमन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी न्यूमोनियाने निधन झाले. रॉन यांनी या मालिकेत रेचल ग्रीनच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

फ्रेण्ड्स या मालिकेचे चाहते जगभर आहेत. या मालिकेची कथा, या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना भावलेले आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी चांगलेच प्रेम दिले. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेतील एका कलाकाराचे नुकतेच निधन झाले आहे.

 

फ्रेण्ड्स या मालिकेतील रॉन लिबमन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी न्यूमोनियाने निधन झाले. रॉन यांनी या मालिकेत रेचल ग्रीनच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या मालिकेत लगेचच चिडणाऱ्या गृहस्थाची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. रॉन हे अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात असून 1950 ला त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रॉन यांचे काम पाहाणाऱ्या अबराम्स आर्टीस्स या एजन्सीने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी याबाबत एक पत्रक जाहीर केले असून त्यात लिहिले आहे की, रॉन हे उत्तम अभिनेते होते. त्यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू पसरवली. त्यांचे निधन नुकतेच झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी जेसिका आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. 

 

रॉन यांना 1993 मध्ये टॉनी या पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्काराच्या ट्विटर हँडलवरून त्यांनी रॉन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, रॉन लिबमन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्याने सर्वोत्तम अभिनेत्याचा टॉनी पुरस्कार जिंकला होता. एंजल्स इन अमेरिका या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो...

 

टॅग्स :हॉलिवूड