Join us

डीजे एरिक दिल्लीतील शोसाठी येणार चक्क रेल्वेने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 21:43 IST

सध्या विदेशी कलाकारांचा भारतात येण्याचा ओघ वाढतच आहे. मुंबईत क्लोड प्ले बॅण्डच्या शोनंतर, जॅकी चैन त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येऊन ...

सध्या विदेशी कलाकारांचा भारतात येण्याचा ओघ वाढतच आहे. मुंबईत क्लोड प्ले बॅण्डच्या शोनंतर, जॅकी चैन त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येऊन गेला. नुकताच हॉलिवूडचा अ‍ॅक्शनस्टार विन डिझेल हाही तब्बल दोन दिवस मुक्कामी आला होता. आता स्वीडनचा दिग्गज डीजे एरिक प्रिड्ज त्याच्या शोसाठी भारतात येत आहे; मात्र शोच्या ठिकाणी चक्क रेल्वेने एंट्री करणार असल्याने त्याचे चाहते या शोसाठी उत्सुक आहेत. पुढच्या महिन्यात म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे ‘वीएच१ सुपरसोनिक आर्केड’ या शोमध्ये डीजे एरिक प्रिड्स परफॉर्म करणार आहे. एरिक पहिल्यांदाच भारतात येत असल्याने त्याच्या भारतीय चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे. गीत आणि संगीताचा मिलाप घडवून आपल्या ‘मॅशअप्स’साठी ओळखला जाणारा एरिक ईडीएम (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक) म्युझिक जगतात खूप मोठे नाव आहे.  त्याचा शो ‘एपिक’च्या माध्यमातून तो लेजर आणि दृश्यांच्या माध्यमातून परफॉर्म करून चाहत्यांना एक वेगळीच अनुभूती देतो. आयोजकांनी दिलेल्या प्रेसनोटनुसार एरिक विमानाने भारतात दाखल झाल्यानंतर शोच्या ठिकाणी जाण्याकरिता रेल्वेने प्रवास करणार आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार पहिल्यांदाच भारतात ट्रेनने प्रवास करणार असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही एक वेगळीच अनुभूती ठरेल हे निश्चित आहे. दरम्यान, तो दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर तेथून थेट रेल्वेस्टेशन गाठणार आहे. त्यानंतर तो शोच्या ठिकाणी पोहोचणार आहे. असे करण्यामागे एरिकचे नेमके काय कारण असू शकते, याचा जरी उलगडा झाला नसला तरी तो यातून त्याच्या चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी होईल, हे निश्चित.