Join us  

थिएटरमध्ये भुताचा सिनेमा पाहताना ७७ वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 12:21 PM

'एनाबेल कम्स होम' चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यानचं एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे.

मागील महिन्यात २६ जून रोजी हॉरर सिनेमा 'एनाबेल कम्स होम' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या दरम्यान एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. असं सांगितलं जातंय की भयावह सिनेमा पाहाताना एका वृद्ध माणसांचा मृत्यू झाला.

सूत्रांच्या माहितीनुसार, हे प्रकरण थायलंडचं आहे. तिथे एनाबेल कम्स होम सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या ७७ वर्षीय ब्रिटीश नागरिक बर्नार्ड चैनिंग याचा मृत्यू झाला. बर्नार्ड, व्हॅकेशनसाठी थायलंडला आले होते. ते एनाबेल कम्स होम पहायला गेले होते. जेव्हा सिनेमा संपला तेव्हा लाइट्स लागली. तर त्यांच्या बाजूला बसलेल्या महिलेनं पाहिलं की बर्नार्ड यांचा मृत्यू झाला होता. 

जेव्हा महिलेने बर्नार्ड यांना पाहिलं तेव्हा ती किंचाळली. तिने आपातकालीन सेवाला कॉल केला. ते लोक आल्यावर त्यांनी बर्नार्ड यांचं पार्थिव झाकलं आणि अॅम्ब्युलन्स बोलवली. कुणालाही समजलं नाही की चित्रपटादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला. स्थानिक पोलिसांनादेखील या प्रकरणाबद्दल कळवण्यात आलं. या घटनेनंतर त्या महिलेला धक्का बसला. त्याचा मृत्यू एनाबेल सिनेमामुळे झाला का हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

कॉमिकबुक डॉट कॉमला प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, थिएटरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही लोक स्टाफसोबत बोलत होते. ते थिएटरमध्ये होते. जिथे त्या माणसाचा मृत्यू झाला होता आणि ते खूप हैराण झाले होते. जे घडले त्याच्यामुळे ते हैराण होते. काही लोक मृत व्यक्तीच्या बाजूला बसले होते. सिनेमा कर्मचारी खूप चिंतेत होते. 

यापूर्वीदेखील २०१६ साली आंध्र प्रदेशमध्ये 'द कॉन्जुरिंग २' पाहताना एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.

एनाबेल कम्स होमबद्दल सांगायचं तर हा सिनेमा खऱ्या जीवनापासून प्रेरीत असल्याचं सांगितलं जातं. यानुसार, १९७० साली अमेरिकेत एका आईने आपली मुलगी डॉनासाठी दुकानातून बाहुली विकत घेतली होती. ही बाहुली काही दिवसानंतर स्वतःहून हलू लागली. असं बोललं गेलं की या बाहुलीमध्ये एनाबेल नामक मुलीची आत्मा आली आहे.

टॅग्स :हॉलिवूड