हॉलिवूड अभिनेत्री एम्बर हर्ड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काल तिने मदर्स डेच्या खास दिवशी चाहत्यांना मोठा सरप्राइज दिला आहे. एम्बर हर्डने ११ मे २०२५ रोजी तिच्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करून जुळ्या मुलांना जन्म दिल्याची माहिती दिली. आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात करत असल्याच तिनं पोस्टमध्ये म्हटलं.
अंबरने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या तिन्ही मुलांच्या पायांचे फोटो आहेत. या क्युट फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "मदर्स डे २०२५ हा असा दिवस आहे, जो मी कधीही विसरणार नाही. गेली अनेक वर्षं मी ज्या कुटुंबासाठी प्रयत्न करत होते, ते आता पूर्ण झाल्याचा आनंद शब्दांत मांडता येणार नाही.
पुढे तिनं लिहलं, "आज मी अधिकृतपणे ही बातमी शेअर करत आहे की, मी माझ्या कुटुंबात दोन जुळ्या बाळांचे स्वागत केले आहे. माझी मुलगी एग्नेस आणि माझा मुलगा ओशन, सध्या माझे हात आणि माझं हृदय पूर्णपणे व्यापून टाकत आहेत. माझं पहिलं मूल ऊनाघ चार वर्षांपूर्वी जन्मलं आणि माझं आयुष्य बदलून टाकलं. तेव्हा मला वाटलं होतं की यापेक्षा जास्त आनंदी कधीच होऊ शकत नाही... पण आता मी तीनपट आनंदी आहे".
पुढे तिनं लिहलं, "आई होणं, तेही स्वतःच्या अटींवर आणि प्रजननक्षमतेतील आव्हानांवर मात करत, हे माझ्या आयुष्यातील बदल घडवणारे अनुभव ठरले आहेत. मी ही निवड करू शकले, याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे". तिने सर्व मातांना मदर्स डेच्या शुभेच्छाही देत लिहिलं, "तुम्ही जिथे कुठे असाल आणि तुम्ही हा प्रवास जसा केला असेल, माझ्या स्वप्नातील कुटुंब आणि मी तुमच्यासोबत हा आनंद साजरा करत आहोत. तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेम".
एम्बर हर्ड ही २०२२ मध्ये अभिनेता जॉनी डेपसोबतच्या वादग्रस्त घटस्फोटामुळे आणि कोर्ट केसमुळे सातत्याने चर्चेत होती. २०१५ मध्ये दोघांचं लग्न झालं होतं, पण ते दोन वर्षांमध्येच संपलं. त्यानंतर दोघांमध्ये झालेली कायदेशीर लढाई जगभर गाजली होती. आता मात्र एम्बर हर्डने आयुष्यातील एका नव्या टप्प्यावर पोहचली आहे आणि आई म्हणून तिचं नव जीवन सुरू झालं आहे. एम्बर हर्ड ही एक अमेरिकन अभिनेत्री असून, तिने 'द डॅनेन गर्ल' (The Danish Girl) आणि 'ॲक्वामन' (Aquaman) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.