Join us  

'H2O कहाणी थेंबाची' सिनेमाचे पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:33 PM

अतिशय गंभीर विषयावर आधारित 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देहे मोजकेच थेंबही तरुणाईला प्रोत्साहन देणारे आहे१२ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे

उन्हाळ्याचे चटके आता जाणवू लागले आहेत. या उन्हासोबतच एक मोठी समस्या अनेक ठिकाणी भेडसावते म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष. आजच्या काळात ऋतू कोणताही असो पाण्याची कमतरता ही कायमच जाणवते. अशा या अतिशय गंभीर विषयावर आधारित 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

 भेगा गेलेल्या जमिनीतून दोन तरुण मुलांचे आक्रमक चेहरे आणि मागील बाजूस एकत्रित आलेली तरुणाई दिसत आहे. मनाशी एक खंबीर निर्धार करून तो पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा ध्यास चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. या पोस्टरमधील तडा गेलेल्या जमिनीवर मोजकेच पाण्याचे थेंब दिसत आहेत. हे मोजकेच थेंबही तरुणाईला प्रोत्साहन देणारे आहे. म्हणूनच चित्रपटाच्या टॅगलाइन मध्ये 'कहाणी थेंबाची' म्हटले आहे. असे म्हटले जाते, की तिसरे महायुद्ध हे पाण्यावरूनच होईल. पण, जर आपल्याला भविष्यात होणारी  ही भीषण स्थिती थांबावायची असेल तर आतापासूनच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. असा काहीसा सकारात्मक संदेश देणारा हा चित्रपट जी. एस. प्रोडक्शन निर्मित असून येत्या १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. पाण्याच्या एका थेंबाचे महत्व सांगणाऱ्या या चित्रपटात अशोक.एन.डी , सुप्रित निकम, धनंजय धुमाळ, शितल अहिरराव, किरण पाटील हे कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन मिलिंद पाटील यांनी केले असून सुनील झवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

टॅग्स :H2O कहाणी थेंबाची