पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील विजेत्या एकांकिकांच्या प्रेमात पडून त्यातील नाट्य शोधण्याची कमाल दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी केली आहे. ‘रेगे’ या वेगळ्या विषयावरील चित्रपटातून पानसे यांनी स्वत:ला दिग्दर्शक म्हणून सिद्ध केले आहे. ‘रेगे’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रातील पदार्पणातच उत्कृष्ट दिग्दर्शनाचे चार अॅवॉर्ड मिळविण्याबरोबरच त्यांच्याच लेखणीतून उतरलेल्या या चित्रपटाने तब्बल २४ अॅवॉर्डवर आपले नाव कोरले. त्यामुळे पदार्पणातच आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखविलेल्या पानसे यांच्या आगामी चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. त्यांचा आगामी ‘उळागड्डी (ओनियो)’ हा चित्रपट भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फाइन आटर््सने २०१३ मध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सादर केलेल्या ‘उळागड्डी’ या एकांकिकेवर आधारित आहे. या एकांकिकेने त्या वेळी करंडकावर आपली मोहोर उमटविली होती, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाला भाषेच्या मर्यादेच्या बाहेर नेऊन ग्लोबल मेसेज देण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. उच्च निर्मितीमूल्ये असणाऱ्या या ‘उळागड्डी’च्या निर्मिती प्रवासाबद्दल स्वत: अभिजित पानसे ‘सीएनएक्स’ वाचकांशी संवाद साधत आहेत. ही गोष्ट आहे दोन व्यक्तींची, त्यातला एक माणूस आहे मराठी आणि दुसरी १५ ते १६ वर्षांची कन्नड मुलगी. उत्तराखंड येथे झालेल्या महाप्रलयावर आधारित दिग्दर्शक शिवराज वायचळ यांच्या या एकांकिकेचे कथानक आहे. या एकांकिकेसह ‘रेगे’मध्ये भूमिका केलेल्या आरोह वेलणकरने पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनेक एकांकिकांबरोबरच ‘उळागड्डी’बद्दल थोडीफार माहिती दिली आणि एकदम या विषयावर चित्रपट करण्याची कल्पना डोक्यात ‘क्लिक’ झाली. कुणालाही चित्रपटनिर्मिती करण्यासाठी न धजावणारी आणि ग्लोबल मेसेज देणारी स्टोरी यात गवसली. ‘रेगे’ यशस्वी ठरला असला तरी पुन्हा क्राइमबेस कथानकावर चित्रपट तयार करायची माझी मुळीच इच्छा नव्हती. एका विषयावर लिहीत होतो... मात्र ‘उळागड्डी’चा विषय अधिकच भावला आणि या चित्रपटाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल, असे वाटले. दिग्दर्शक म्हणून हा चित्रपट साकारणे मला निश्चितच आव्हानात्मक वाटले. मग एकांकिकेचे दिग्दर्शक शिवराज यांच्याकडून कथेची पार्श्वभूमी ऐकली. मात्र चित्रपटासाठी कथानकात थोडेफार बदल केले. कारण एकांकिका हा फॉर्म पडद्यावर येतो तेव्हा त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या खूप गोष्टी जोडल्या जातात. उत्तराखंडाचा प्रलय दाखविणे सोपे काम नाही, त्यामुळे त्याचे चित्रीकरण कसे केले असेल, असा प्रश्न पडणेही स्वाभाविक आहे. पण यासाठी कोणताही सेट न उभारता बनारसच्या स्टुडिओमध्ये शूटिंग करण्यात आले़ यासाठी ४ कॅमेऱ्यांचे सेटअप आणि २ अॅलेक्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे याचा वापर करण्यात आला आहे. मराठीमध्येच काय हिंदीमध्येदेखील अशा तंत्रज्ञानावर आधारित चित्रपटाची निर्मिती झाली नसेल! नुकतेच चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम पूर्ण झाले असून, बायलिंग्वल असलेला हा चित्रपट २०१६ मध्ये जगभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
(शब्दांकन - नम्रता फडणीस)