समजा तुम्हाला अचानक एखादे भूत भेटले तर? पण भुते ही कल्पनेतच असतात आणि विज्ञानाच्या कसोटीवर तर ती क्षणभरसुद्धा टिकत नाहीत. पण मजा म्हणून अशी एखादी कल्पना करायला काय हरकत आहे? त्याने रोजच्या आयुष्यात थोडी गंमत घडून येणार असेल, तर या भुतांना मज्जाव करण्याची काही गरज नाही. भूतकथांमध्ये रंगवलेली भुते ही बहुतेकवेळा भयावह असली, तरी काहीवेळा ती प्रेमळही असल्याचे मांडले जाते. अर्थात, हे सगळे गोड ‘भूत’माहात्म्य आत्ताच उगाळण्याचे कारण म्हणजे ‘अ पेर्इंग घोस्ट’ हा चित्रपट! यात एका घरात चक्क भुतांचे एक कुटुंबच राहायला आलेले आहे; आणि हे कुटुंब अजिबात न घाबरवता चक्क हवेहवेसे वाटू लागते, यातच काय ते आले.एका कॉलनीवजा चाळीत राहणाऱ्या माधवच्या एकटेपणाचा फायदा त्याचे शेजारीपाजारी करून घेत असतात. शेजारच्या गणपुल्यांच्या करामतीमुळे तर माधवच्या घरात पाण्याचा थेंबही येत नाही. या मंडळींच्या उद्योगाला माधव वैतागलेला असला, तरी साध्या स्वभावामुळे तो त्यांना काही बोलत नाही. चाळीतली वृंदा मात्र माधवच्या गाढ प्रेमात असते. पण माधव मात्र त्याच्या आॅफिसमधल्या माधवीच्या प्रेमात असतो. एक दिवस अचानक माधवच्या घरात त्याच्या ध्यानीमनी नसताना गजानन एकबोटे, त्याची पत्नी गामिनी आणि त्यांच्या सहा मुली असे कुटुंब अवतरते. ही सर्व मंडळी भुते असल्याचे कळताच माधव हबकतो. पण त्यांचा जाच न होता उलट झालाच तर फायदाच होणार, याची खात्री पटल्यावर माधव त्यांना घरात ठेवून घेतो. कालांतराने माधवचे माधवीवरचे अव्यक्त प्रेम वास्तवात उतरते; आणि या घरात त्यांचा संसार सुरू होतो. माधवीला अंधारात ठेवून भुतांच्या कुटुंबाला घरात सामावून घेण्याची कसरत माधव करत राहतो. अनेक मजेशीर प्रसंग आणि गमतीजमती घडवत हा गोतावळा धमाल उडवतो.व.पु. काळे यांच्या ‘बदली’ या मूळ कथेचा विस्तार शर्वाणी आणि सुश्रुत यांनी केला आहे. यात माध्यमांतर करताना आणि गोष्टीच्या आकर्षितेत भर घालण्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम जाणवतात. निव्वळ एक कल्पनारम्यता मांडायची आणि दोन घटका करमणूक करायचा असा हेतू दिग्दर्शक सुश्रुत भागवतने ठेवल्याचे चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासूनच स्पष्ट होत जाते. उगाच खोलात न शिरता आणि डोके बाजूला काढून हलक्याफुलक्या क्षणांची रुजवात करायची एवढाच त्याचा उद्देश आहे; आणि त्याने तो रंजकतेने सादर केला आहे. माधव आणि माधवीचे वास्तव जीवन एकीकडे व एकबोटे आणि गामिनीचे अदृश्य आयुष्य दुसरीकडे यातली तारेवरची कसरत यात पाहायला मिळते. मात्र गोष्टीला अजून वेग असता, तर जास्त मजा आली असती. तसेच, यातला दहीहंडीचा प्रसंग आणि त्या अनुषंगाने येणारा सामाजिक कंगोराही अनावश्यक वाटतो. यातल्या भुतांच्या सहा मुलींचे प्रयोजनही स्पष्ट होत नाही. या चित्रपटाचा बाज कल्पनारम्यतेचाच असल्याने त्यात अजून चांगल्या प्रसंगांची पेरणी करण्यासही वाव होता, असेही प्रकर्षाने जाणवत राहते. संजय मोने यांची पटकथा मात्र जमलेली असून, त्यांच्या खुसखुशीत संवादांनी गोष्टीत रंगत आणली आहे.उमेश कामत (माधव) व स्पृहा जोशी (माधवी) यांची जोडी यात मस्त जमली आहे. या दोघांचा अभिनय लाघवी झाला आहे. स्पृहाच्या अवखळपणाने यात अधिकच भर घातली आहे. पुष्कर श्रोत्री (एकबोटे) व शर्वाणी पिल्लई (गामिनी) यांचा ‘भूतयोनी’तला वावरही प्रसन्न आहे. पुष्करच्या चेहऱ्यावरचा लव्हेबलपणा आणि शर्वाणीच्या व्यक्तिमत्त्वातल्या गोडव्यामुळे ही भुतेही नकळत आपलीशी होऊन जातात. यात अनिता दातेने रंगवलेली वृंदा ठोसपणे लक्षात राहते. अतुल परचुरे, गिरीश जोशी, समीर चौघुले आदी कलावंतांची चांगली साथ मुख्य कलावंतांच्या चौकडीला मिळाली आहे. प्रसाद भेंडे यांचे छायांकन उत्तम झाले आहे आणि यातले प्रेमगीतही रंगले आहे. उगाच नको ते प्रश्न मनात न आणता, क्षणभर विरंगुळा म्हणून या चित्रपटाकडे पाहिल्यास यातली ‘भुताटकी’सुद्धा प्रेमात पडायला लावू शकते.
प्रेमात पडायला लावणारी ‘भुताटकी’!
By admin | Updated: May 30, 2015 09:08 IST