Join us

गौरी पहिल्यांदाच रंगभूमीवर

By admin | Updated: November 19, 2016 02:28 IST

सध्या मराठीत एकापाठोपाठ एक चांगली दर्जेदार नाटके येताहेत

सध्या मराठीत एकापाठोपाठ एक चांगली दर्जेदार नाटके येताहेत. एवढेच नाही, तर या नवीन नाटकांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार रंगभूमीकडे वळले आहेत. सुरुची आडारकर, सुयश टिळक, प्राजक्ता माळी, सौरभ गोखले यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री गौरी नलावडेदेखील प्रेक्षकांना पहिल्यांदाच रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. ‘अ‍ॅप्सुलुट’ हे तिच्या नाटकाचे नाव असणार आहे. तिच्या या आगामी नाटकाविषयी गौरी ‘लोकमत सीएनएक्स’ला सांगते, आपल्या दैनंदिन जीवनात आपण कोणाशी ना कोणाशी खूप कनेक्ट आहोत, असे वाक्य सातत्याने ऐकत असतो. मात्र हे जे कनेक्ट असणे म्हणजे नेमके काय असते, हे या नाटकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पहिल्यांदाच रंगभूमीवर येत असल्यामुळे मला आनंद होत आहे. पण कुठेतरी थोडी भीतीदेखील वाटते आहे. पण असे म्हणतात, की रंगभूमीवर उभे असलो, की तुमच्या अंगात काहीतरी संचारत असते. एक कलाकार म्हणून तुम्ही दुपटीने एनर्जी लावून काम करता, त्यामुळे नेमकी ती काय जादू असते हे मला अनुभवायचं आहे. त्यामुळे मी हे नाटक करण्यासाठी प्रचंड उत्साही असल्याचे गौरीने या वेळी सांगितले. या नाटकाचा पहिला प्रयोग २८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.