Join us

धर्मराजांसाठीच एफटीआयआयच्या गादीचा हट्ट!

By admin | Updated: October 8, 2015 05:24 IST

महाभारतात धर्मराज ‘युधिष्ठिर’ने सत्याची भक्कम बाजू घेत एक बॅलन्स साधायचा प्रयत्न केला होता. गजेंद्र चौहान यांनी या भूमिकेमध्ये प्राण ओतले होते...

महाभारतात धर्मराज ‘युधिष्ठिर’ने सत्याची भक्कम बाजू घेत एक बॅलन्स साधायचा प्रयत्न केला होता. गजेंद्र चौहान यांनी या भूमिकेमध्ये प्राण ओतले होते... पण प्रत्यक्षात पांडवांच्या उदार आणि मवाळ मतवादी धोरणाचा विसर पडून कौरवांसारखा ‘जहाल’ पवित्रा त्यांनी घेतला आहे, ते ‘राजीनामा’ द्यायला तयार नाहीत आणि त्यांच्यासारखा निष्ठावान कार्यकर्ता मिळणार नाही, म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय त्यांना हटवायला तयार नाही; पण मंत्रालयाची भूमिका इतकी ‘हटवादी’ का? हाच प्रश्न इथे पडतो. जर भाजपात अनेक चित्रपट अभिनेत्यांनी ‘खासदारकी’पर्यंत मजल मारली आहे. त्यांचे चित्रपट आणि राजकारण दोन्हींमध्ये समान योगदान आहे. ‘शॉटगन’ म्हणजे शत्रुघ्न सिन्हा हा हुकमी एक्का भाजपाकडे आहे, यातच ते एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत, संस्थेचे वातावरण... मुलांची मानसिकता या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळे या पदासाठी ते नक्कीच योग्य आहेत. हेमामालिनीलाही सगळ्याच गोष्टी हँंडल करण्याचा उत्तम अनुभव आहे. ज्येष्ठ अभिनेता विनोद खन्ना यांनीही राजकारण गाजवले आहे, तर पदार्पणातच विजयाची पताका फडकविणारे परेश रावल हेसुद्धा विराजमान होऊ शकतात. अभिनेत्री किरण खेर यांचाही यात उल्लेख करावा लागेल. ही नावे पाहिली तरी भाजपाकडे अनुभवी अभिनेत्यांची फळी आहे. भाजपाला स्वत:ची आश्वासक प्यादी बाहेर काढून विद्यार्थ्यांनाही चितपट करता येऊ शकते ना! आंदोलन अधिकच चिघळवले जात आहे. या नावांचा विचार केला असता, तर उगाच इतके प्रकरण ताणले गेले नसते.