Join us  

Flashback 2022 : हृदयाची धडधड थांबली अन्..., ‘या’ वर्षात या सेलब्रिटींनी हार्ट अटॅकने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 8:00 AM

Flashback 2022: 2022 हे मावळतं वर्षही नेहमीप्रमाणे ‘कभी खुशी कभी गम’ देणारं ठरलं. अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी या वर्षात अचानक एक्झिट घेतली.

2022 हे मावळतं वर्षही नेहमीप्रमाणे ‘कभी खुशी कभी गम’ देणारं ठरलं. या वर्षात काही वाद झालेत, काही आनंदाच्या घटना घडल्या, तशाच काही दु:खद घटनाही. अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी या वर्षात अचानक जगातून एक्झिट घेतली. हार्ट अटॅकने हृदयाची धडधड थांबली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं, अशा अनेक घटना या वर्षात पाहायला मिळत आहेत. अगदी हसता-बोलता हृदयविकाराने जीव जात आहेत. या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं.  लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तब्येत बिघडली अन् केके...

सर्वांचा लाडका गायक केके यावर्षी सर्वांना सोडून गेला. यावर्षी 31 मे महिन्यात त्याचं निधन झालं.   कोलकातात केके लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गात होता. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आणि पाठेपाठ त्याच्या निधनाची बातमीच चाहत्यांना मिळाली. अवघ्या 53 व्या वर्षी केके जग सोडून गेला.  

जिममध्ये वर्कआऊट करताना कोसळला अन्..

सर्वांना खळखळून हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनीही यावर्षी जगाचा निरोप घेतला. राजू श्रीवास्तव नेहमीप्रमोण जिममध्ये वर्कआऊट करत होते. ट्रेडमिलवर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. जवळपास 40 दिवस त्यांनी मृत्यूला झुंज दिली. 21 सप्टेंबर 20022 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.  

क्रिकेट खेळत असतानाच तो कोसळला...

‘भाभी जी घर पर है’ या मालिकेत मलखानची भूमिका गाजवणारा अभिनेता दीपेश भान यानेही अचानक जगातून एक्झिट केली. वयाच्या 41 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. दीपेश मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. 23 जुलैला खेळता खेळता त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. रूग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

 जिम करत असतानाच हार्ट अटॅक आला...

46 वर्षाचा फिटनेस फ्रिक टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यालाही जिममध्ये वर्कआऊट करत असताना हृदयविकाराचा झटका आला. बेशुद्धावस्थेत त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. उपचारादरम्यान सिद्धांतचं निधन झालं.

 त्या अगदी ठणठणीत होत्या पण...

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचं 19 नोव्हेंबर 2022 रोजी निधन झालं. मृत्यूआधी त्या अगदी ठणठणीत होत्या. दहा दिवसांआधी त्यांनी एका शोचं शूट केलं होतं. पण त्यादिवशी दोन मिनिटाच्या आत त्यांना दोन हार्ट अटॅक आलेत आणि यात तबस्सुम यांचं निधन झालं. त्या 78वर्षांच्या होत्या. 

अँड्रिलाही जग सोडून गेली....

लोकप्रिय बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्माच्या ही सुद्धा हार्ट अटॅकने गेली. अवघ्या 24 वर्षाच्या अँड्रिलाने 20 नोव्हेंबर रोजी  अखेरचा श्वास घेतला. दोन वेळा कॅन्सरला हरवणारी अँड्रिला ब्रेन स्ट्रोक आणि कार्डियाक अरेस्टविरोधातील लढाई जिंकू शकली नाही. तिला मल्टिपल कार्डियाक अरेस्टचा सामना करावा लागलेला.  

मराठी अभिनेताही सोडून गेला...

मराठी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये आपल्या भूमिकेने छाप पाडणारे ठाण्यातील अभिनेते पराग बेडेकर यांचे 13 डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. ते 47 वर्षांचे होते.   यदाकदाचित, नथुराम गोडसे यांसारख्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. आभाळमाया या मालिकेतील त्यांची भूमिका देखील गाजली होती. 

टॅग्स :फ्लॅशबॅक 2022केके कृष्णकुमार कुन्नथराजू श्रीवास्तवटिव्ही कलाकारसेलिब्रिटी