Join us

बाप-लेकीचे नाते उलगडणारा ‘...बाबांची कहाणी’

By admin | Updated: June 20, 2016 01:44 IST

बाप-लेकीच्या हळव्या, हृदयस्पर्शी नात्यावर भाष्य करणारा ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित होत आहे.

बाप-लेकीच्या हळव्या, हृदयस्पर्शी नात्यावर भाष्य करणारा ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला कवी संदीप खरे हे एका वेगळ्या रूपात पाहायला मिळतील, तर अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा हा चित्रपट टर्निंग पॉइंट असेल, असे बोलले जात आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निर्माते विशाल धनावडे, नितीन चव्हाण, दिग्दर्शक योगेश जाधव, संस्कृती बालगुडे, संदीप खरे, सलील कुलकर्णी या संपूर्ण टीमने नुकतीच ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली व चित्रपटाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटाच्या कथेविषयी सांगताना दिग्दर्शक योगेश जाधव म्हणाले, ‘सोशल विषय घेऊन अनेक एकांकिका केल्या आहेत. ‘ओझे’ नावाची एक एकांकिका होती. त्यावर चित्रपट करायचा एक विचार आला, पण ते नाव चित्रपटासाठी योग्य नसल्याने ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे नाव चित्रपटाला द्यायचे ठरविले. यावर गाणेदेखील होते, पण मग पुढे प्रश्न आला की, बाबा कोण? मग डोक्यात आले संदीप खरे यांचे नाव. संदीप खरे त्यांच्या भूमिकेविषयी सांगताना म्हणाले, ‘मला इमेजपेक्षा भूमिका महत्त्वाची वाटते. म्हणून बाबांची भूमिका स्वीकारली. मला ही भूमिका देऊन दिर्ग्दशकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. या चित्रपटातील बाबा माझ्याशी रिलेट करतात. पहिल्यांदाच गाण्यावरून चित्रपट तयार झाला आहे. गाण्यामध्ये आशय आहे, पण या सिनेमामध्ये या पलीकडे जाऊन काही गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. काळजी करून दमलेला बाबा या सिनेमात पाहायला मिळेल.’ सिनेमाची स्क्रि प्ट वाचताना समजले क ी, माझी तार या कथेशी जुळत आहे. अशा प्रकारचे अवाहानात्मक काम करायला मला आवडेल, अशी भावना मनात आली. वैयक्तिक आयुष्यात माझी मुलगी मोठी होताना मी पाहिली आहे, त्यामुळे मी या कथेशी जास्त रिलेट झालो. हा विषय फार महत्त्वाचा आहे. कारण आता तुम्ही पाहिले, तर बालवाडीतील मुलगीसुद्धा सुरक्षित नाही. या सिनेमात अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. - संदीप खरे २००९ मध्ये हे गाणं आलं आणि ते प्रसिद्ध झालं. गाण्याचे पिक्चरायजेशन सगळ््यांनी आपापल्या मनात या आधी केले होते. आपण इमॅजिन केलेल्या गोष्टी या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार या गोष्टींचा आनंद आहे.- सलील कुलकर्णीहा चित्रपट करण्यासाठी माझ्या वडिलांनी आग्रह केला होता. कथा वाचल्यानंतर हा विषय मला खूप आवडला अन् मी चित्रपट करण्याचे ठरविले. माझे आणि माझ्या वडिलांचे नाते असेच खूप जवळचे आहे. मी केवळ माझ्या वडिलांसाठी हा चित्रपट केला. - संस्कृती बालगुडे