Join us

भावा, कुठल्या जगात राहतोस? फरहान अख्तरनं केलं हॉकी टीमचं अभिनंदन, झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 16:05 IST

अभिनेता फरहान अख्तर पुन्हा नेटक-यांच्या निशाण्यावर आला आहे. कारण आहे त्याचं एक ट्विट.

ठळक मुद्देचूक लक्षात आल्यावर फरहाननं ट्विट डिलीट केलं आणि पुन्हा एक ट्विट केलं.

अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) पुन्हा नेटक-यांच्या निशाण्यावर आला आहे. कारण आहे त्याचं एक ट्विट. होय, भारतीय पुरूष हॉकी टीमने ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षांनंतर पदक जिंकलं आणि फरहाननं अभिनंदनाचं ट्विट केले. पण हे काय? विजयी पुरुष संघाचं अभिनंदन करण्याऐवजी फरहाननं महिला हॉकी संघाचं अभिनंदन केलं. ‘गो गर्ल्स’ करणा-या फरहानचं हे ट्विट क्षणात व्हायरल झालं. त्याची चूक नेटक-यांनी नेमकी पडकली आणि मग काय, फरहान जबरदस्त ट्रोल झाला.

फरहाननं ट्विट लगेच डिलीट केलं. पण तोपर्यंत त्याच्या ट्विटचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाले होते. ‘गो गर्ल्स, भारतीय संघाने दाखवलेल्या लढवय्या वृत्तीचा फार अभिमान वाटतोय. त्यांनी आपल्याला चौथं पदक जिंकून दिलं आहे. भारी कामगिरी,’ असं फरहानने या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

नेटक-यांनी मग फरहानची जोरदार खिल्ली उडवली. अगदी त्याची तुलना आलिया भटसोबत (आलियाच्या जनरल नॉलेजबद्दल अनेक जोक्स तुम्हाला ठाऊक आहेतच.) केली गेली.

फरहान म्हणजे वेगळ्या जगाला प्राणी, बॉलिवूड म्हणजे मूर्खांचे नंदनवन आहे, अशा काय काय कमेंट नेटक-यांनी केल्या. एकंदर काय तर एका  ट्विटनं फरहानचं चांगलचं हसू झालं.चूक लक्षात आल्यावर फरहाननं ट्विट डिलीट केलं आणि पुन्हा एक ट्विट केलं. ‘भारतीय संघाने दाखवलेल्या लढवय्या वृत्तीचा फार अभिमान वाटतोय. त्यांनी आपल्याला चौथं पदक जिंकून दिलं आहे. भारी कामगिरी,’ असं म्हटलं आहे.  

टॅग्स :फरहान अख्तर