ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.31- शाळेतील मित्राने फेसबुकवर केलेल्या कमेंटमुळे अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी महिलांना सेल्फ डिफेन्सचे धडे देणाऱ्या एका ट्रेनिंग सेंटरच्या पदवीदान समारंभामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्राने हजेरी लावली होती. यावेळी तिने आपण लहान असताना कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचं सांगितलं होतं. यावर परिणीतीचा शाळेतील मित्र कानू गुप्ताने परिणीती खोटं बोलत असल्याचं म्हंटलं. वर्गमित्राच्या या कमेंटवर परिणीतीने आता आपली बाजू मांडली आहे. माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला असं स्पष्टिकरण परिणीतीने दिलं आहे.
परिणीतीने ट्विटर अकाऊंटवरून आपली बाजू मांडली. जेव्हा ती अंबालामधील शाळेत शिकत होती तेव्हा तिला आणि तिच्या भावाला गाडी दिली जात नव्हती. म्हणून तिचा भाऊ बसमधून आणि ती सायकलवरून शाळेत जायची. आपल्या वक्तव्यामध्ये तिने म्हटलं की, ‘मी शाळेत सुरक्षित पोहोचले की नाही ते पाहण्यासाठी माझे बाबा माझ्या मागून शाळेपर्यंत यायचे. माझ्या वडिलांकडे गाडी होती पण लहान असल्यामुळे आम्हाला शाळेत जाण्यासाठी त्याचा वापर करू दिला जायचा नाही. मला सायकलवरून शाळेत जाणं अजिबात आवडायचं नाही. पण मी स्वावलंबी बनावं म्हणूनच त्यांनी तेव्हा हे सगळं केलं होतं हे मला आज कळलं आहे, असं स्पष्टीकरण परिणीतीने दिलं आहे.
गरिबीमुळे शाळेत सायकलवरून जावं लागायचं तसंच मार्शल आर्ट शिकण्याची इच्छा असूनही पैसे नसल्यामुळे कधी शिकता आलं नाही या तिच्या विधानावर ‘परिणीती तुला एका चांगल्या कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही तू प्रसारमाध्यमांसमोर किती खोटं बोलत आहेस? तुझ्याच शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे मला तुझ्या वडिलांकडे असलेली गाडीसुद्धा आठवते आहे. त्यावेळी सायकलवरुन शाळेत येण्याचा ट्रेंडच होता. त्यामुळे ज्यांना त्यावेळी सायकलवरुन शाळेत येण्याची संधी मिळाली नाही त्यांना याची खंत वाटायची’, असं कानू गुप्ताने त्याच्या एफबी पोस्टमध्ये लिहिलं होतं.