Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनयासोबत डबिंगही एन्जॉय करतो

By admin | Updated: April 24, 2017 02:06 IST

मनीष वाधवा सध्या एका मालिकेत बाळाजी विश्वनाथ ही भूमिका साकारत आहे. ऐतिहासिक अथवा पौराणिक मालिकेत काम करणे हे सोपे नसते असे मनीषला वाटते.

मनीष वाधवा सध्या एका मालिकेत बाळाजी विश्वनाथ ही भूमिका साकारत आहे. ऐतिहासिक अथवा पौराणिक मालिकेत काम करणे हे सोपे नसते असे मनीषला वाटते. त्याने कोहिनूर या मालिकेपासून त्याच्या छोट्या पडद्यावरील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...तू अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केले आहेस, या मालिकांमध्ये काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिका करत असताना तुम्हाला भाषेचे भान ठेवणे गरजेचे आहे. आजच्या युगात बोलताना अनेक भाषांचा वापर करून बोलण्याची आपल्याला सवय असते. इंग्रजीचे काही शब्द तर सर्रास आपल्या रोजच्या बोलण्यात वापरले जातात. पण पौराणिक अथवा ऐतिहासिक मालिकांची भाषाच संपूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे संवाद म्हणताना तुम्हाला प्रचंड सतर्क राहावे लागते. तसेच तुम्ही साकारत असलेल्या व्यक्तिरेखेविषयी खूप सारा अभ्यास करावा लागतो. त्या व्यक्तिरेखेला तुम्हाला अक्षरश: जगावे लागते असे मला वाटते. तसेच या मालिकांमध्ये तुमची रंगभूषा, वेशभूषा ही खूपच वेगळी असते. काही वेळा तर तुम्ही परिधान करत असलेल्या कपड्यांचे वजन कित्येक किलो असते.बाळाजी विश्वनाथ या भूमिकेसाठी तुला काही अभ्यास करावा लागला का?मी ही मालिका करण्यापूर्वी बाजीराव पेशवे यांच्या आयुष्याविषयी काहीच वाचले नव्हते. पण त्यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या चित्रपटातून मला त्यांच्याविषयी खूप काही जाणून घेता आले होते. या चित्रपटानंतर मी बाजीराव पेशव्यांच्या अक्षरश: प्रेमात पडलो होतो. त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. ही मालिका स्वीकारल्यानंतर तर या मालिकेच्या रिसर्च टीमने मला बाजीरावांविषयी खूप माहिती सांगितली. बाजीराव या महान योद्ध्याच्या आयुष्यावर आधारित असलेल्या मालिकेत मला काम करायला मिळत आहे याचा मला प्रचंड आनंद होत आहे.तू एक अभिनेता असण्यासोबतच एक डबिंग आर्टिस्टदेखील आहेस, या अनुभवाविषयी काय सांगशील?मी अभिनयक्षेत्रात आलो, त्या वेळी सुरुवातीच्या काळात खूपच कमी मालिका माझ्याकडे होत्या. त्यामुळे खूपच कमी पैसे मला मिळत असत. त्या पैशात घर भागवणे मला कठीण जात होते. त्या वेळी माझ्या काही मित्रांनी मला या क्षेत्राविषयी सांगितले. माझा आवाज दमदार असल्याने मी डबिंग आर्टिस्ट म्हणून एक माझी वेगळी ओळख निर्माण केली. आतापर्यंत अनेक इंग्रजी चित्रपट मी हिंदीत डब केले आहेत. डबिंग करण्याआधी मी तो चित्रपट पाहून घेतो. मला ज्या व्यक्तिरेखेचे डबिंग करायचे आहे, त्या व्यक्तिरेखेविषयी समजून घेतो. त्या व्यक्तिरेखेची बोलण्याची ढब जाणून घेतो आणि त्यानंतर डबिंग करतो. माझ्या अभिनयाप्रमाणे डबिंगचेदेखील प्रचंड कौतुक केले जात आहे.तू रंगमंचाद्वारे तुझ्या करिअरला सुरुवात केली आहेस, चित्रपट आणि नाटक या दोन्ही माध्यमांमध्ये तुला कोणते माध्यम अधिक प्रिय आहे?मी माझ्या कॉलेजजीवनापासून नाटकांमध्ये काम करत आहे. त्यामुळे रंगमंच हे माझ्या अधिक जवळचे आहे. पण त्याहीपेक्षा अभिनय हे माझे पहिले प्रेम आहे. त्यामुळे चित्रपट, नाटक, मालिका कोणतेही माध्यम असो मला अभिनय करणे आवडते.