Join us  

'अभिनेता व्हायचं स्वप्न विसरुन जा'; महेश भट्टने दिली होती इमरान हाश्मीला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:13 PM

Emraan hashmi: पहिल्याच सिनेमाच्यावेळी महेश भट्टने दिली होती इमरान हाश्मीला धमकी; २० वर्षानंतर केला अभिनेत्याने खुलासा

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan hashmi) सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत येत आहे. अलिकडेच त्याचे 'सेल्फी' आणि 'टायगर 3' हे दोन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले. या दोन्ही सिनेमात खलनायिकी भूमिका साकारत त्याने त्याच्या अभिनयाची दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर आणली. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. यामध्येच त्याने त्याच्या करिअरविषयी आणि इंडस्ट्रीविषयी बरेच खुलासे केले आहेत. यात त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट (mahesh bhatt) यांच्याविषयी एक मोठा खुलासा केला आहे.

महेश भट्ट यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यामुळे आज बॉलिवूडला काही स्टार्सही मिळाले आहेत. मात्र, महेश भट्ट यांनी चक्क त्यांच्या भाच्यालाच इंडस्ट्रीत आल्यानंतर धमकावलं होतं. इमरान हाश्मीने २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी महेश भट्ट यांनी सल्लावजा धमकी त्याला दिली होती. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये इमरानने २० वर्षांपूर्वी घडलेला किस्सा सांगितला आहे.

इमराने २००३ मध्ये फुटपाथ या सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. यावेळी इमरानला त्याच्या मामाने अर्थात महेश भट्ट यांनी सल्लावजा धमकी दिली होती. मात्र, त्यांच्या धमकीमुळे इमरानच्या करिअरचा ग्राफ चेंज झाला.

"ज्यावेळी मी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करायचा विचार करत होतो. त्यावेळी माझं पहिलं प्रोजेक्ट मी विक्रम भट्ट यांच्यासोबत करत होतो. या सिनेमाच्या माध्यमातून मी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार होतो. त्या सिनेमाचं नाव होतं फुटपाथ. हा एक क्राइम थ्रिलर सिनेमा होता", असं इमरान हाश्मी म्हणाला.

पुढे तो म्हणाला, "या सिनेमाच्या निर्मितीमध्ये महेश भट्ट फार महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यामुळे शुटिंग सुरु करण्यापूर्वी त्यांनी मला एक चेतावनी दिली होती. 'एक तर मी सांगतोय ते ऐक नाही तर फिल्मी इंडस्ट्रीमध्ये येण्याचं विसरुन जा', असं ते मला म्हणाले होते. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. जर शुटिंग सुरु असताना त्यांना माझं काम आवडलं नाही तर ते मध्येच शुटिंग थांबवतील आणि मला सिनेमातून बाहेर हकलतील."

दरम्यान, त्यावेळी मनात आलं असतं तर मी ते काम सोडून दुसरीकडे काम मागायला गेलो असतो. पण, त्यावेळी त्यांनी दिलेल्या धमकीला मी मोटिवेशन समजून काम केलं. त्यांच्या त्या वाक्यानंतर मी ठरवलं की जीव तोडून मेहनत करायची आणि सिनेमात काम करायचं.  इमरान लवकरच शो टाइम या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. येत्या ८ मार्च रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, मौनी रॉय, राजीव खंडेलवाल, श्रेया सरन आणि विजय राज ही कलाकार मंडळी झळकणार आहे

टॅग्स :इमरान हाश्मीमहेश भटबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा