Join us

माझ्यावर मनोज कुमार यांच्या चित्रपटांचा प्रभाव - अनिल शर्मा

By admin | Updated: March 4, 2016 20:34 IST

दिग्दर्शक अनिल शर्मा हेही देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनिल शर्मा यांनी आपला आनंद असा शब्दातून व्यक्त केला.

अनिल शर्मा
दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेले मनोज कुमार हे देशभक्तीपर चित्रपट निर्मितीबाबत प्रसिद्ध आहेत. हुकुमत, तहलका आणि एलान-ए-जंग ते गदर यासारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे दिग्दर्शक अनिल शर्मा हेही देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. मनोजकुमार यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनिल शर्मा यांनी आपला आनंद असा शब्दातून व्यक्त केला.
 
आजचा दिवस हिंदी चित्रपट इंडस्ट्री आणि जगभरातील हिंदी चित्रपट चाहत्यांसाठी तसेच माझ्यासाठीही खास आहे. मनोजकुमार साहेब यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याच्या वृत्ताने माझी अनेक दिवसांची प्रतीक्षा पूर्ण केली. खरे तर मी खूप वर्षापासून या वृत्ताची प्रतीक्षा करत होतो. दरवर्षी जेंव्हा या पुरस्काराची घोषणा व्हायची आणि मी पुन्हा अपेक्षा करायचो की, पुढील वर्षी मनोजकुमार साहेब यांचे नाव येईल. मी किती खूश आहे ते शब्दात सांगू शकत नाही. 
 
मनोजकुमार साहेब यांच्याशी माझे नाते अतिशय जवळचे आहे. लहानपणापासून त्यांचे चित्रपट पाहत आलो आहे. आपल्या चित्रपटातून ते ज्याप्रकारे देशभक्ती दाखवत होते, त्यावरुन देशभक्ती काय आहे याची जाणीव व्हायची. मी देशभक्तीच्या चित्रपटांपासून चित्रपट निर्मिती सुरु केली याचे श्रेय मनोजकुमार साहेब यांनाच जाते. रोटी कपडा और मकान, उपकार, शहीद, पूरब और पश्चिम ते शोर्पयत त्यांचा कोणताही चित्रपट पहा आपल्याला याची जाणीव होईल की, किती उत्तम दर्जाचे चित्रपट बनविले आहेत. 
मनोजकुमार साहेब अभिनेते आणि दिग्दर्शकासह उत्कृष्ट गीतकारही आहेत. एकदा मीही प्रयत्न केला होता की, त्यांनी माझ्या चित्रपटासाठी गाणी लिहावीत. मी त्यांना भेटायलाही गेलो होतो. ते तयारही झाले होते. पण, नंतर काही कारणास्तव मी त्यांच्यासोबत काम करु शकलो नाही. जेंव्हा दुस-यांदा पुन्हा प्रयत्न केला तेंव्हा प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी जवळपास निवृत्ती घेतली होती. 
हा पुरस्कार उशिरा मिळाल्याबाबत बोलायचे झाले तर मी फक्त एवढेच म्हणोल की, जिथे दिवस उजाडला तेथून सुरुवात करायला हवी. ही वेळ यासाठी महत्वाची आहे की, आम्ही सर्वानी मनोजकुमार साहेब यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारासाठी आनंदोत्सव करायला हवा. पुन्हा एकदा मनोजकुमार साहेब यांना शुभेच्छा. तर धन्यवाद यासाठी की, त्यांनी माझी अनेक दिवसांची प्रतीक्षा पूर्ण केली. 
...