Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाटक ‘कंपनी’त रंगले चारचौघे...!

By admin | Updated: May 18, 2017 03:07 IST

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानल्या जाणाऱ्या कालखंडात नाटकांची ‘कंपनी’ असायची. ही ‘कंपनी’ म्हणजे एकप्रकारे नाटकाचे बिऱ्हाडच असायचे. काळाच्या ओघात नाटकांचे

- राज चिंचणकर । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानल्या जाणाऱ्या कालखंडात नाटकांची ‘कंपनी’ असायची. ही ‘कंपनी’ म्हणजे एकप्रकारे नाटकाचे बिऱ्हाडच असायचे. काळाच्या ओघात नाटकांचे मोठे दौरे संपुष्टात आल्याने ‘कंपनी’ची ही प्रथाही पडद्याआड गेली, पण आता त्या प्रथेची आठवण व्हावी, असा प्रकार नव्या पिढीतल्या चार कलावंतांच्या माध्यमातून दृष्टीस पडत आहे.सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या दोन नाटकांच्या निमित्ताने या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे. ‘बंधमुक्त’ हे नाटक रंगभूमीवर येऊन काही महिने झाले असतानाच, ‘शंभूराजे’ या नाटकाचे प्रयोगही पुन्हा एकदा धडाक्यात सुरू झाले आहेत. या दोन नाटकांमध्ये सामायिक काय असेल, तर त्यात भूमिका रंगवणारे चार कलावंत! अभिनेता अमोल कोल्हे, शंतनू मोघे, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि लतिका सावंत हेच ते चौघे कलावंत आहेत. या दोन नाटकांत या चौघांचे मंचीय नाते उत्तम जुळल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, या दोन्ही नाटकांचा बाज अतिशय भिन्न आहे, तरी त्याचे अचूक व्यवधान बाळगत, या चौघांनी ही ‘कंपनी’ सक्षमतेने सांभाळली आहे. या ‘कंपनी’चा थेट फायदा या कलावंतांना होत असून, या दोन्ही नाटकांचे प्रयोग सादर करताना या कलावंतांचा एकमेकांना मिळणारा सहकार्याचा हात महत्त्वाचा ठरत आहे. ‘ट्युनिंग’साठी उपयोग... आमच्या चौघांच्या या ‘कंपनी’मुळे आमच्यातले ‘ट्युनिंग’ उत्तम जुळले आहे. त्यामुळे एकत्र काम करताना आमच्यातली सहकार्य आणि समाधानाची भावना नक्कीच वाढते. नाटकांचे प्रयोग उत्तम रंगण्यासाठी तिचा चांगला उपयोग होत असतो. - अमोल कोल्हे, अभिनेता व निर्माता