Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. अमोल कोल्हेचे नवे नाटक लवकरच

By admin | Updated: July 15, 2017 02:20 IST

डॉ. अमोल कोल्हेने आतापर्यंत अनेक चित्रपट, नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

डॉ. अमोल कोल्हेने आतापर्यंत अनेक चित्रपट, नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पण, त्याची खरी ओळख ही एका प्रसिद्ध मालिकेमुळे आहे. या मालिकेत तो शिवरायांच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. आता तो प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अमोलने आतापर्यंत चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. शंभूराजे, बंधमुक्त यांसारखी त्याची अनेक नाटकं गाजली आहेत. आता तो पुन्हा एकदा रंगमंचावर काम करण्यास सज्ज झाला आहे. त्याचे ‘अर्धसत्य’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या नाटकात तो मुख्य भूमिकेत असणार आहे. प्रसाद दाणी यांची कथा असलेल्या अर्धसत्य या नाटकाची तालीम सध्या जोरात सुरू आहे. या नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहोनी करणार आहेत तर या नाटकाची निर्मिती ही मुकेश शिपूरकर यांची आहे. या नाटकात अमोल कोल्हे एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळतेय. त्याच्यासोबत या नाटकात प्रसाद दाणी, गौरीश शिपूरकर, दीपक करंजीकर आणि सरिता मेहेंदळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. अर्धसत्य या नाटकाद्वारे एक नवा विषय हाताळला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. हे नाटक लवकरच रंगमंचावर दाखल होणार आहे. अर्धसत्य या नाटकाचा पहिला लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या नाटकाचा पहिला लूक डॉ. अमोल कोल्हेने त्याच्या फेसबुक अकाऊं टवर शेअर केला आहे. अमोलने या नाटकाच्या व्हिडीओचा पहिला लूक शेअर केल्यापासून तीन हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.