Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिग्दर्शकांची हीरोगिरी

By admin | Updated: July 17, 2015 04:51 IST

अभिनेता- अभिनेत्री जरी चित्रपटाचा चेहरा असला तरी खरा कप्तान हा दिग्दर्शक असतो. मात्र, तो फारसा पुढे येत नाही. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शकांच्या

अभिनेता- अभिनेत्री जरी चित्रपटाचा चेहरा असला तरी खरा कप्तान हा दिग्दर्शक असतो. मात्र, तो फारसा पुढे येत नाही. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शकांच्या नावावर चित्रपटांचे प्रमोशन सुरू झाले आहे. अनेक दिग्दर्शकांनी स्वत:चा वेगळा प्रेक्षकवर्गही निर्माण केला आहे. मराठीमध्ये व्ही. शांताराम, दादा कोंडके, राजा परांजपे यांसारखे स्वत: अभिनय करणारे दिग्दर्शक होते. त्यांच्या स्वत:च्या निर्मितीसंस्थाही असल्याने त्यांच्या नावावर चित्रपट चालत. अनंत माने, राजदत्त, भालजी केळकर, जब्बार पटेल यांसारख्या दिग्दर्शकांनीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, मधल्या काळात दिग्दर्शक पडद्याआड गेले होते. मात्र, आता पुन्हा याची सुरूवात झाली आहे. ‘बायोस्कोप’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीतील चार दिग्दर्शक एकत्र आले आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनचे मुख्य सूत्र हे ‘चार दिग्दर्शक, चार कविता’ हे आहे. गजेंद्र अहिरे, रवी जाधव, विजू माने आणि गिरीश मोहिते हे चार दिग्दर्शक या चित्रपटातील चार लघुपट दिग्दर्शित करत आहेत. प्रत्येकाची वेगळी स्टाईल आहे. वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. तो कॅश करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘तु ही रे‘ या आगामी चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांनी जोरदार पब्लिसिटी सुरू केली आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक संजय जाधव यांचा चित्रपट म्हणूनही त्याची प्रसिध्दी केली जात आहे. ‘चेकमेट’, रिंगा रिंगा’, फक्त लढ म्हण’ ‘दुनियादारी’ या चित्रपटाचे ते दिग्दर्शक असल्याने त्यांनीही स्वत:चा वेगळा प्रेक्षक निर्माण केला आहे. निर्माता- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या चित्रपटांचेही प्रेक्षकांना वेगळे आकर्षण असते. ‘महेश मांजरेकर फिल्म’ म्हणूनच तो चित्रपट प्रेझेंट केला जातो. नव्या दमाचा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या चित्रपटांविषयी प्रेक्षकांना कुतूहल असते. उमेशच्या कामाची दखल घेऊन अगदी अमिताभ बच्चनलाही ‘विहिर’च्या निमित्ताने मराठीत यावेसे वाटले. उमेशच्या आगामी ‘हायवे’मध्ये हिंदी-मराठीतील अनेक स्टार्स असले तरी ‘उमेश कुलकर्णी’चा चित्रपट आहे, हे अधिक ठसविले जात आहे. दिग्दर्शक गिरीश मोहिते म्हणाले, ‘‘चित्रपटाचे चांगले किंवा वाईट जे काही व्हायचे ते दिग्दर्शकाकडूनच होते. परंतु, मराठी चित्रपटांच्या एकंदर बजेट कमी असल्याने दिग्दर्शकाला फारसं स्वातंत्र्य मिळत नाही. त्याला काही अपवादही आहेत. माझ्या ‘भारतीय’च्या वेळी अभिजित घोलप आणि ‘बे दुणे साडेचार’च्या वेळी नानजीभार्इंनी फक्त स्क्रिप्ट पाहिली होती. त्यानंतर संपूर्ण सिनेमा माझा होता. ‘बायोस्कोप’ हा तर खऱ्या अर्थानं दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. नवा प्रयोग त्यामध्ये केलेला आहे. मुख्य म्हणजे दिग्दर्शक म्हणून आम्हाला जे अभिव्यक्त व्हायचे आहे, त्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले. आवडेल ती कथा, पाहिजे ते कलाकार घेता आले. त्याचा परिणाम दिसला आहे.’’