Join us  

अभिनेता डिनो मोरियाला या कारणामुळे बजावण्यात आले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 5:14 PM

डिनो मोरिया आणि डिजे अकील यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.

ठळक मुद्देडिनो मोरिया आणि डिजे अकील यांचे स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड आणि संदेसरा ग्रुप या कंपनींसोबत काही व्यवहार झाले असल्यामुळे या दोघांना समन्स बजावण्यात आले आहेत.

अभिनेता डिनो मोरियाने प्यार में कभी कभी या चित्रपटापासून त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने त्यानंतर राज, अक्सर, लाइफ में कभी कभी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. डिनो गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. अलोन या 2015 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर सोलो हा तामीळ चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो कोणत्याच चित्रपटात झळकला नाही. पण आता एका वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे. स्टर्लिंग बायोटेक घोटाळ्याबाबत डिनो मोरिया आणि डिजे अकील यांना समन्स बजावण्यात आले आहे. 

डिनो मोरिया आणि डिजे अकील यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून संदेसरा बँक कर्ज प्रकरणात या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. हा घोटाळा जवजवळ साडे चौदा हजार कोटींचा असून याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड, संदेसरा ग्रुप, नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती चेतन संदेसरा यांनी बँकांकडून चुकीच्या पद्धतीने चौदा हजार कोटी घेतले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या संदेसरा कुटुंबातील लोकांनी  खोट्या कंपन्या दाखवून अनेक कोटींचे कर्ज घेतले होते. यांनी बँकांना इतक्या कोटींचा चुना लावल्यानंतर ऑक्टोबर 2017 मध्ये सीबीआयने एफआयआर दाखल करून या प्रकरणाची चौकशी केली होती. 

डिनो मोरिया आणि डिजे अकील यांचे या कंपनींसोबत काही व्यवहार झाले असल्यामुळे या दोघांना समन्स बजावण्यात आले आहेत. स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड, संदेसरा ग्रुप, नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती चेतन संदेसरा यांच्याविरोधात सीबीआयने पाच हजार 700 कोटी रुपयांच्या फसवणुकीची केस दाखल केली होती. हा घोटाळा पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यापेक्षा देखील मोठा असल्याचे म्हटले जात आहे. पंजाब नॅशन बँकेचा घोटाळा हा 11 हजार 400 कोटींचा होता. त्याहीपेक्षा कित्येक पटीने मोठा हा घोटाळा असल्याचा दावा ईडीने केला आहे. 

टॅग्स :डिनो मोरिया