ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - शाहरुख खानच्या 'दिलवाले' आणि संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव-मस्तानी' या दोन चित्रपटांमध्ये सध्या बॉक्स ऑफीसवर प्रचंड चुरस आहे. पहिल्या दोन दिवसांच्या कमाईवर नजर टाकली तर, सध्या तरी 'दिलवाले'ने बाजी मारल्याचे चित्र आहे.
पहिल्यादिवशी दिलवालेने २१ कोटींची कमाई केली तर, बाजीराव-मस्तानीने पहिल्या दिवशी १२.८० कोटीचा गल्ला गोळा केला. दुस-या दिवशी शाहरुखच्या दिलवालेने ४० कोटींचा टप्पा पार केला आहे तर, बाजीराव-मस्तीनची दुस-या दिवशीचे उत्पन आहे १५.५२ कोटी.
बाजीराव-मस्तानीच्या उत्पनामध्ये दुस-या दिवशी वाढ झाली असली तरी, या चित्रपटाच्या निर्मितीवर १२० कोटींचा खर्च आला आहे. त्यामुळे केलेली गुंतवणूक वसूल होणे आवश्यक आहे. समीक्षकांनी दिलवालेपेक्षा बाजीराव-मस्तानीबद्दल अधिक सकारात्मक मत व्यक्त केले होते.
हे दोन्ही बिग बजेट चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि बाजीराव-मस्तानीला दिलवालेच्या तुलनेत कमी चित्रपटगृहे मिळाली त्याचा काही प्रमाणात फटका या चित्रपटाला बसला आहे.