मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि त्याची पत्नी तृप्ती हे दोघे विभक्त होत असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आलं होतं. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. खरेतर तृप्तीने तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर 'जाधव' आडनाव ऐवजी 'अक्कलवार' आडनाव वापरल्यामुळे या चर्चांना अधिक जोर आला. दरम्यान आता तृप्ती अक्कलवार(Trupti Akkalwar) ने आडनाव का हटवल्यामागचे कारण समोर आले. त्याबद्दल नुकतेच कांचन अधिकारी यांना दिलेल्या मुलाखतीत तृप्तीने याबद्दल खुलासा केला.
कांचन अधिकारी यांच्या ‘बातो बातो में’ या शोमध्ये नुकतेच तृप्ती अक्कलवारने हजेरी लावली होती. यावेळी तिने जाधव आडनाव हटवल्यामागचे कारण सांगितले. ती म्हणाली की, लॉकडाउन दरम्यान सिद्धू सहज बोलून गेला की तुला कोण ओळखतं? तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात. तुझी काय आयडेंटिटी आहे? नवरा बायकोत छोटी छोटी भांडणं होतात तसेच ते छोटे भांडण होते. पण तो जे सहज बोलला ते माझ्या मनाला खूप लागले आणि त्यादिवशी ठरवले की आपण स्वतःची ओळख बनवायची. मग एका मैत्रिणीला सोबत घेऊन स्वतःचा स्टार्टअप सुरू केला.
तृप्तीने निर्माण केली स्वतःची ओळख
तृप्ती पुढे म्हणाली की, नवऱ्याकडून पैसे घेऊ शकत नव्हते कारण मला ते स्वतः करून दाखवायचे होते. त्यामुळे जवळच्या मैत्रिणी, ओळखीच्या लोकांकडून अगदी ७% ने मी आणि एका मैत्रिणीने ५० लाखांचे कर्ज घेतले आणि स्वैरा एंटरप्राइजेस नावाने कंपनी सुरू केली. त्यात साड्यांचा ब्रँड सुरू केला. या कमाईतून आज मी जवळपास ९०% कर्ज फेडले आहे. या पैशांतूनच आता होम स्टेच्या उद्देशाने नागावमध्ये व्हिला खरेदी केला. आता मी माझी ओळख तृप्ती सिद्धार्थ जाधव म्हणून नाही तर तृप्ती अक्कलवार म्हणून सांगते.
तृप्तीने महिलांना केलं आवाहन
मला सर्व महिलांना हेच सांगायचंय की तुम्हीही चार भिंतीमध्ये अडकून न राहता बाहेर पडा, स्वतःची ओळख बनवा, असे आवाहनही यावेळी तृप्ती अक्कलवार हिने केले.