सत्तरच्या दशकात मराठी सिनेइंडस्ट्रीत सोज्वळ आणि देखणी म्हणून अभिनेत्री अनुपमा खूप प्रचलित होत्या. त्या सध्या सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाही आहेत. मात्र त्या शिकागोत वास्तव्यास असून तिथे नाटकाच्या माध्यमातून कलेशी जोडलेल्या पहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी तेजश्री प्रधान आणि आस्ताद काळे अभिनित ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकाच्या प्रयोगाला त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी तेजश्री प्रधानसोबत त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता, इतक्या वर्षांनी अनुपमा यांना पाहायला मिळाल्याने अनेक प्रेक्षक चकीत झाले होते.
अनुपमा यांचे लग्नापूर्वीचे नाव रेखा कुलकर्णी आहे. २३ एप्रिल १९५० रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अनुपमा हे नाव त्यांना कथा, संवाद आणि नाट्यलेखक मधुसूदन कालेलकर यांनी दिले होते. अनुपमा यांचे वडील जयंत कुलकर्णी हे रेल्वेत नोकरीला तर आई अलका कुलकर्णी या एलआयसीमध्ये काम करत होत्या. त्यांचे शालेय शिक्षण माटुंग्याच्या लोकमान्य विद्यामंदिरमध्ये तर पुढील शिक्षण त्यांनी रुपारेल महाविद्यालयात घेतले. अनुपमा यांनी वयाच्या सतराव्या वर्षी मधुसूदन कालेलकर यांच्या आसावरी या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. याच नाटकातील भूमिकेच्या नावाने पुढे त्यांना ओळख मिळाली. या नाटकामुळे त्यांना चित्रपटात येण्याची संधी मिळाली.
१९६९ साली आधार हा चित्रपट रिलीज झाला त्यात अनुपमा यांनी निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांच्यासोबत मुख्य भूमिका केली होती. गजन जोशी यांनी ७० च्या दशकातील दैवाचा खेळ, आधार, सौभाग्य कांक्षीनि अशा चित्रपटातून अभिनय साकारला होता. आधार या चित्रपटातील ‘माझ्या रे प्रीती फुला…’ हे गीत पुण्याच्या प्रसिद्ध सारसबाग येथे गजन जोशी आणि अनुपमा यांच्यावर चित्रीत केले होते ही या गाण्याची खास आठवण म्हणावी लागेल. ‘तांबडी माती’ (१९६९), ‘देवमाणूस’ (१९७०), ‘नाते जडले दोन जिवांचे’ (१९७१), ‘पाठराखीण’ (१९७२), ‘राजा शिवछत्रपती’ (१९७४), ‘सापळा’ (१९७६) ‘परिवर्तन’ (१९७९) या चित्रपटांमध्ये अनुपमा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मराठी चित्रपटांमधून अनेक भूमिका केलेल्या अनुपमा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यावर ‘संसार’, ‘दुनिया क्या जाने’, ‘सांस भी कभी बहू थी’, ‘दो बच्चे दस हाथ’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘पाप और पुण्य’ या चित्रपटांमधून भूमिका केल्या. फक्त मराठी आणि हिंदीच नाही तर अनुपमा यांनी गुजराती चित्रपटसृष्टीतही आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. ‘धरती ना लोलू’ या गुजराती चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना गुजरात सरकारने पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. तसेच ‘जेसल तोरल’ (१९७१), ‘जेहर तो विखा जानी’ (१९७७) अशा बऱ्याच चित्रपट त्या झळकल्या आहेत.नाटक, चित्रपट असा प्रवास सुरु असताना बडोद्याच्या डॉ दिलीप धारकर यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला आणि शिकागोला स्थायिक झाल्या. विदेशात राहूनही त्या शांत बसल्या नाहीत तर तिथल्या कलाकारांना घेऊन त्यांनी ‘माऊली’ सारख्या नाटकाचे दिग्दर्शन केले.