Join us  

"सेटवर बाथरुम नसायचे, आम्ही झाडाच्या मागे...", सिनेइंडस्ट्रीबाबत दिया मिर्झाचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:14 PM

सिनेइंडस्ट्रीमध्ये महिलांना मिळणारी वागणूक आणि सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीमध्ये महिलांना मिळणाऱ्या सुविधांबद्दलही दियाने स्पष्टपणे मत मांडलं आहे.

दिया मिर्झा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. एकेकाळी चाहत्यांच्या हृदयाचा ठेका घेणारी दिया अभिनेत्रीबरोबरच निर्मातीदेखील आहे. 'रहना है तेरे दिल में' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दियाला पहिल्याच सिनेमाने प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर 'तुमको ना भुल पायेंगे', 'तहजीब', 'प्रतीक्षा', 'ब्लॅकमेल' अशा अनेक चित्रपटांत दिया झळकली. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या दियासाठी हा प्रवास मात्र सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दियाने सिनेइंडस्ट्रीबाबत अनेक खुलासे केले आहेत. 

दियाने नुकतीच 'बीबीसी हिंदी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सिनेइंडस्ट्रीमध्ये महिलांना मिळणारी वागणूक याबाबत भाष्य केलं. त्याबरोबरच सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीमध्ये महिलांना मिळणाऱ्या सुविधांबद्दलही दियाने स्पष्टपणे मत मांडलं आहे. "तेव्हा सिनेइंडस्ट्रीत काम करणाऱ्या महिलांची संख्या खूपच कमी होती. त्यामुळे प्रत्येक क्षणी भेदभाव केल्याचा फरक जाणवायचा. आमच्या व्हॅनिटी व्हॅन अभिनेत्यांपेक्षा छोट्या असायच्या. अनेकदा शूटिंग सेटवर बाथरुमही नसायचे. आम्हाला झाडाच्या मागे जावं लागायचं. तिथे मग तीन-चार लोक कपडे पकडून उभे करावे लागायचे. कपडे बदलण्यासाठी पण अनेकदा जागा मिळायची नाही," असं म्हणत दियाने सिनेइंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासा केला. 

सेटवर पुरुष आणि महिलांमध्ये केल्या जाणाऱ्या भेदभावावरुन दिया मिर्झाने मुलाखतीत भाष्य केलं. ती म्हणली, "सेटवर पुरुष उशीरा आले तर काही बोललं जायचं नाही. पण एखाद्या महिलेमुळे थोडा जरी उशीर झाला तरी आम्हाला लगेच अव्यावसायिक म्हटलं जायचं." पुढे ती म्हणाली, "आजही सिनेइंडस्ट्रीत काम करणाऱ्या महिलांची संख्या तुलनेने कमी आहे. जेव्हा मी काम करायला सुरुवात केली होती. तेव्हा फक्त मी आणि माझी हेअरड्रेसर सेटवर असायचो. या व्यतिरिक्त कोणतीही महिला सेटवर नसायची. पण, या इंडस्ट्रीत पुरुषच आत्तापर्यंत काम करत आले आहेत...अजूनही तेच चित्र आहे. जोपर्यंत हे बदलत नाही...त्यांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत या गोष्टी बदलणार नाहीत. मला वाटतं आता हळूहळू बदलाची सुरुवात झाली आहे."

टॅग्स :दीया मिर्झासेलिब्रिटी