Join us  

Dharmendra: नातू करण देओलच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये अनुपस्थित राहणार धर्मेंद्र, सांगितलं यामागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 2:00 PM

करण देओलचा काल १२ जून रोजी रोका सेरेमनी पार पडली. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होते. फक्त धर्मेंद्र कुठेच दिसले नाहीत.

बी-टाऊनमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहतायेत. धर्मेंद्र यांचा नातू करण लवकरच बोहल्यावर चढणार आहे. धर्मेंद्र यांचा जुहू येथील आलिशान बंगल्यात लग्नाची लगबग सुरु झाली आहे. सनी देओल यांचा मुलगा करण देओल लवकरच बिमल रॉय यांची नात द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे. आता बातम्या येत आहेत की धर्मेंद्र आपल्या नातवाच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.

करण देओलचा काल १२ जून रोजी रोका सेरेमनी पार पडली. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होते. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झालेत. सनी देओल, बॉबी देओल आणि अभय देओल तिन्ही भावांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर येऊन पोझ देखील दिल्या. पण या सगळ्याच्या मध्ये आजोबा धर्मेंद्र कुठेच दिसले नाहीत. आता यामागचं कारण समोर आलं आहे. 

धर्मेंद्र फक्त नातवाच्या लग्नालाच हजेरी लावणार आहेत, इतर कार्यक्रमापासून ते दूर राहणार आहे. रोका समारंभात  न येण्याचे कारण स्पष्ट करताना धर्मेंद्र म्हणाले, 'मुलांना आनंद घेऊ द्या. मी तिथे असलो तर मुलांना बंदिस्त वाटेल. आपल्यावर निर्बंध असल्यासारखे त्यांना वाटेल. हा क्षण त्यांनी गमावू नये असे मला वाटते. धर्मेंद्र म्हणाले की, आता ते फक्त १८ जूनला होणाऱ्या लग्नाला उपस्थित राहणार आहे.

द्रिशा आणि करण गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. द्रिशा ट्रॅव्हल इंडस्ट्रीशी निगडीत आहे आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. 

संपूर्ण देओल कुटुंब करणच्या लग्नासाठी एकत्र येऊन जोरदार तयारी करतेय. मीडिया रिपोर्टनुसार, हे लग्न 16, 17, 18 जून असे तीन दिवस चालणार असल्याचे बोलले जात आहे. रिसेप्शन 18 जून रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे आहे. करण द्रिशाचे 18 जून रोजी मुंबईत पोस्ट-वेडिंग रिसेप्शन होणार आहे. निमंत्रणपत्रिका छापण्यात आली असून बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील जवळपास सर्वांनाच आमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. संपूर्ण देओल कुटुंब करण आणि द्रिशाच्या लग्नात सहभागी झाल्याची बातमी आहे. 

टॅग्स :धमेंद्रकरण देओलसनी देओल