Join us  

Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’मध्ये डॉक्टरचा खेळ संपणार, त्याजागी सुरु होणार तितिक्षा तावडेची नवी मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 11:24 AM

Devmanus 2 : 'देवमाणूस २' मालिकेतील एकापाठोपाठ एक येणाऱ्या ट्वीस्टमुळे प्रेक्षक वैतागले होते. मालिका संपवा, अशी मागणीही करत आहेत. अखेर ही मालिका संपणार आहे. त्याजागी नवी मालिका सुरु होणार आहे.

झी मराठीवर (Zee Marathi) अनेक नव्या मालिकांची रेलचेल आहे. नव्या मालिकांसह जुने कलाकार पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करताना दिसत आहेत. देवमाणूस मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते.  पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात, त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. अशा या नेत्राची गोष्ट लवकरच झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे. 

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नायिका नेत्राला भविष्यात काय घडणार हे दिसतं. त्यामुळेच गावातली सामान्य मुलगी असूनही ती असामान्य ठरलीय. नेत्राला साक्षात त्रिनयना देवीनेच भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलंय. नेत्राला तिच्याकडील या दिव्यशक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे. परंतु तिला भविष्य दिसत असलं तरी तिचं आयुष्य सोपं नाही. तिला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. अशी ही नेत्रा वर्तमानातील आयुष्य जगताना भविष्याचा वेध कसा घेते, हे पाहणं उत्कंठा वाढवणारं असणार आहे. या मालिकेचं सादरीकरण गूढ रहस्यमय पद्धतीने करण्यात येणार असून मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे अनोखे पैलू यात उलगडले जाणार आहेत.

या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसंच या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत. तर मालिकेची निर्मिती केली आहे आयरिस Production (विद्याधर पाठारे) यांनी. "सातव्या मुलीची सातवी मुलगी" १२ सप्टेंबर पासून रात्री. १०.३० वा. फक्त झी मराठीवर पाहायला मिळणार आहे..

टॅग्स :रात्रीस खेळ चालेतितिक्षा तावडेटिव्ही कलाकार