Join us  

अधुरी प्रेम कहाणी.. ! 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे झाले होते देव आनंद, पण.....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 10:20 AM

रोमान्सिंग विथ लाईफ’ या त्यांच्या आत्मचरित्रात देव आनंद यांनी आपल्या प्रेम प्रकरणांबाबत सविस्तर लिहिले आहे.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 रोजी पंजाबच्या गुरदास कस्बेमध्ये झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत देव आनंद यांना ‘रोमान्सचा बादशहा’ म्हणून ओळखले जाते. आपल्या आत्मकथेची सुरूवातही त्यांनी ‘रोमांसिंग विद लाईफ’या शीर्षकाने केली आहे. आज देव आनंद आपल्यात नाहीत. पण त्यांचे चित्रपट आणि त्यांच्या रूपातील एक चिरतरूण अभिनेता आजही सर्व सिनेरसिकांच्या मनात जिवंत आहे.

चॉकलेट हिरो देव आनंद यांना आयुष्यभर चिरतरूण राहण्याचा आनंद घेता आला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. देव आनंद यांच्या आयुष्यात अनेक महिला आल्या. त्यातील सुरैय्या यांच्यासोबतचे प्रेमप्रकरण गाजले. आपल्या महाविद्यालयीन काळात इतिहासाच्या प्राध्यापकाच्या मुलीशी त्यांचे एकतर्फी प्रेमप्रकरण होते. त्यांना ती मुलगी खूप आवडायची. परंतु तिला सांगण्याचे धाडस देव आनंद यांच्यात नव्हते. त्यामुळे त्यांचे हे पहिले प्रेम गुलदस्त्यात राहिले. ‘रोमान्सिंग विथ लाईफ’ या त्यांच्या आत्मचरित्रात देव आनंद यांनी आपल्या प्रेम प्रकरणांबाबत सविस्तर लिहिले आहे.

वयाच्या 25 व्या वर्षी म्हणजे 1948 साली देव आनंद यांनी सुरैय्या यांच्यासमवेत ‘विद्या’ या चित्रपटात काम केले. देव आनंद यांच्या अनुसार सुरैय्या यांची भेट ‘जीत’ चित्रपटाच्या सेटवर झाली. यावेळी त्यांच्या मनात आकर्षण झाले. तो काळ सुरैय्या यांचा होता. आकर्षणाचे रुपांतर प्रेमात झाले. देव आनंद त्यावेळी मुंबईच्या चर्चगेटहून चालत मरीन ड्राईव्ह येथील सुरैय्या यांच्या घरापर्यंत जायचे. त्यावेळी सुरैय्या यांना पाहण्यासाठी खूप गर्दी व्हायची. सुरैय्या यांच्या आईला या दोघांचे प्रेम पसंत होते, मात्र सुरैय्या यांच्या आजीला हे आवडले नाही.

त्या काळात इतरत्र फिरता येत नसायचे. केवळ सेटवरच एकमेकांशी बोलणे व्हायचे. देव आनंद आणि सुरैय्या यांनी लग्न करावयाचे ठरविले, मात्र सुरैय्या यांच्या आजीने याला विरोध केला. आजीच्या निर्णयाविरुद्ध जाण्यास सुरैय्यानी नकार दिला होता. त्यावेळी अनेक जण हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करायचे. या दोघांच्या प्रेमाबाबतही माध्यमांनी जोरदार अफवा उठविल्या. 

पुढे आजीचा हा विरोध इतका प्रखर झाला की,तिने देव व सुरैया यांच्या भेटीगाठी बंद केल्या. फोनवर बोलणेही कठीण झाले. या स्थितीतही देव आनंद यांनी सुरैयाला धीर दिला. पण एका क्षणाला आजीच्या विरोधापुढे सुरैया जणू पराभूत झाली. यानंतर एकदिवस ती देव आनंदला भेटली आणि मला विसर असे सांगून कायमची निघून गेली. ही भेट शेवटची ठरली. या भेटीनंतर देव आनंद भावाच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडले होते. तिकडे आजीला विरोध का केला नाही, हे शल्य आयुष्यभर सुरैयाला बोचत राहिलं. लग्नाचा विचारही तिने केला नाही. देव आनंद यांनी दिलेली अंगठी तिने समुद्रात फेकली. पण त्यांच्या आठवणी तिने हृदयात कायम जपून ठेवल्या.  

टॅग्स :देव आनंद