Join us  

OTT प्लॅटफॉर्मवर कन्टेन्टच महत्त्वाचा; 'जून' हा माझ्यासाठी 'स्पेशल' चित्रपट : निलेश दिवेकर

By जयदीप दाभोळकर | Published: June 30, 2021 10:57 PM

June Movie : 'जून' माझ्यासाठी 'स्पेशल', 'त्या' एका सीनसाठी १६ वेळा खावं लागलं पान; निलेशनं सांगितला सिलेक्शन किस्सा

ठळक मुद्दे निलेशनं सांगितला सिलेक्शन किस्सा

जयदीप दाभोळकरफरारी की सवारी, कँडल मार्च, नटसम्राट, व्हेंटिलेटर, गुटर गूँ यांसारख्या चित्रपट आणि मालिकांमधून निलेश दिवेकरनं आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अगदी अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता निलेश हा आता 'जून' या चित्रपटातून आगळ्यावेगळ्या भूमिकेद्वारे समोर येणार आहे. ३० जून रोजी 'जून' हा चित्रपट प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील भूमिका, चित्रपट कसा मिळाला आणि चित्रपटातील काही किस्से याबाबत निलेशनं लोकमत ऑनलाईनशी मनसोक्त गप्पा मारल्या.

"आजकाल लहान मुलंही मी स्ट्रेस्ड आहे वगैरे असे भारी भरकम शब्द सर्रास वापरताना आपण पाहतो. त्यांच्या वेळही काही गोष्टी आपण कशा सोडवू शकतो यात घालवतात. त्यावरच ती मुलं विचार करत बसलेली असतात. अशा प्रकारे आपापल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असलेली मुलं एकत्र येतात आणि त्यातून या चित्रपटाची गोष्ट पुढे जाते," असं निलेश म्हणाला. निलेशनं आपल्या अनोख्या कॅरेक्टरबद्दलही यावेळी सांगितलं.

या चित्रपटात निलेश हा जयस्वाल नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. एकदम चप्पट केस, सतत सोसाटीतल्या लोकांना त्यांनी कसं राहायचं, काय करायचं असं मॉरल पोलिसिंग करणारं हे कॅरेक्टर असल्याचं निलेश म्हणाला. एखादी गोष्ट आपणही करायची नाही आणि दुसऱ्यांनाही करुन द्यायची नाही अशी आपल्या आजूबाजूलाही काही लोक असतात, तसंच अगदी हे कॅरेक्टर आहे. कधीकधी एखाद्या व्यक्तीला आपण चोपलं पाहिजे असं आपल्या मनात येतं, त्यांनी आपल्याला काहीच केलं नसेल तरी तशा भावना आपल्या मनात येतात. तसंच या कॅरेक्टरकडे बघून होतं असं तो हसत म्हणाला. 

असं झालं सिलेक्शन"रोहन मापुसकर यांनं या चित्रपटासाठी माझं कास्टिंग केलं. त्यानं हे कॅरेक्टर अगदी इंटरेस्टींग असल्याचं मला सांगितलं. त्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन मी त्याचं ऑडिशनही दिलं. याचे दोन टेक मी निखिल महाजन यांना पाठवले. त्यांनी ते पाहिले आणि त्यांनाही ते अतिशय आवडले. परंतु त्यानंतर अन्य काही प्रोजेक्ट्स सुरू असल्यामुळे माझ्यासमोर डेट्स देण्याचा प्रश्न होता. परंतु माझ्या डेट्स नुसार लेखक निखिल महाजन यांनंही तारखा ॲडजस्ट करण्याची ग्वाही दिली. माझ्यासाठी ती फार मोठी गोष्ट होती. या चित्रपटाचा सबजेक्टही चांगला होता. हा चित्रपट आणि हे कॅरक्टर माझ्या नशिबात होतं. त्यानंतर औरंगाबादमध्ये याचं शूटिंग झालं आणि आज हा चित्रपट सर्वांसमोर आहे," असं निलेश आपल्या भूमिकेबद्दल म्हणाला.

पान खाण्याचा किस्सा अजूनही आठवतोयचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक पान खाण्याचा सीन होता आणि तो अजूनही मला आठवतोय असं निलेश सांगतो. पान खाऊन थुंकण्याचा तो सीन वेगवेगळ्या अँगलनं शूट करण्यात आला आणि त्यासाठी तब्बल १५ ते १६ वेळा पान खाल्लं असल्याचंही त्यानं हसत सांगितलं.

ओटीटीमध्ये कंन्टेंट महत्त्वाचाओटीटी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटांमध्ये पाहायला गेलं तर मोठा फरकही आहे. चित्रपट थिएटर्समध्ये मोठा अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या जोरावरही शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करतो. परंतु ओटीटीवर कंन्टेंट महत्त्वाचा असतो. कोरोनाच्या काळात अनेक वेबसीरिज आल्या. परंतु त्यातल्या मोठे चेहरे असूनही चालल्या नाहीत. ओटीटीवर लोकांना कंन्टेंट आवडणं महत्त्वाचं आहे, असं ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंन्टेंटबद्दल बोलताना तो म्हणाला. 

पुढील काळात आपली एक मोठी वेबसीरिज येणार आहे. परंतु त्याबद्दल आता सांगणं थोडी घाईचं होईल. पण ती यावर्षातली सर्वात मोठी वेब सीरिज असेल असं निलेशनं पुढील प्रोजेक्ट्सबद्दल सांगताना म्हटलं.

टॅग्स :नाटकमराठी