Join us

मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:16 IST

पैसे घेऊन मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला अभिनेत्याने हजेरी लावली होती. एवढंच काय, तर अंत्यसंस्काराला रडलास तर अजून पैसे मिळतील अशी ऑफरही बॉलिवूड अभिनेत्याला मिळाली होती.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पैसे घेऊन बर्थडे, पार्टी आणि लग्नसोहळ्याला हजेरी लावतात, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. अगदी  ८०-९०च्या दशकातही या गोष्टी होत होत्या. पण, पैसे घेऊन मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला अभिनेत्याने हजेरी लावली होती, हे सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का? एवढंच काय, तर अंत्यसंस्काराला रडलास तर अजून पैसे मिळतील अशी ऑफरही बॉलिवूड अभिनेत्याला मिळाली होती. खुद्द अभिनेत्यानेच मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. 

अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी पैसे दिले गेलेला हा अभिनेता म्हणजे चंकी पांडे. त्यांनी नुकतीच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये चंकी पांडे यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, "मी एका शूटिंगसाठी जात होतो तेवढ्यात ऑरगनायझरचा मला फोन आला आणि त्याने मला फिल्म सिटीला एका इव्हेंटला जायला सांगितलं. मी त्यांना कोणते कपडे घालू असं विचारल्यावर त्यांनी मला पांढरे कपडे घाल असं सांगितलं. मी कोणताही विचार न करता पांढऱ्या रंगाचे कपडे घालून तिथे पोहोचलो. सगळेच जण पांढरे कपडे घालून आले होते. एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचंही मी पाहिलं. लोक माझ्याबद्दल चर्चा करत होते". 

"मी खूप भोळा होतो आणि मला असं वाटलं की मी पोहचेपर्यंत ऑर्गनायझरचा मृत्यू झाला आहे. पण, नंतर मी एका कोपऱ्यात त्याला पाहिलं. त्याने मला सांगितलं की सर, काळजी करू नको. तुमच्या मानधनाचं पाकीट माझ्याकडे आहे. पण, जर तुम्ही रडलात तर तुम्हाला अजून पैसे मिळतील, असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. आणि हे खरं घडलं आहे", असं म्हणत चंकी पांडे यांनी त्यांच्याबरोबर घडलेला हा किस्सा सांगितला. 

दरम्यान, चंकी पांडे त्यांच्या आगामी 'हाऊसफूल ५ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. अलिकडेच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस अशी स्टारकास्ट आहे. 

टॅग्स :चंकी पांडेसेलिब्रिटी